पीएमआरडीएतर्फे सोमवारपासून पुन्हा ‘हातोडा’; २५०० पेक्षा अधिक अतिक्रमणांवर कारवाई

By नारायण बडगुजर | Updated: March 15, 2025 18:48 IST2025-03-15T18:48:43+5:302025-03-15T18:48:59+5:30

वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर धडक कारवाई करत ते जमीनदोस्त करण्यात येत आहेत.

PMRDA to 'hammer' again from Monday; action against more than 2500 encroachments | पीएमआरडीएतर्फे सोमवारपासून पुन्हा ‘हातोडा’; २५०० पेक्षा अधिक अतिक्रमणांवर कारवाई

पीएमआरडीएतर्फे सोमवारपासून पुन्हा ‘हातोडा’; २५०० पेक्षा अधिक अतिक्रमणांवर कारवाई

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील अतिक्रमणविरुद्ध मोहीम यशस्वी होत असून आता दुसऱ्या टप्प्याची आखणी १७ ते ३० मार्चदरम्यान करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांवर धडक कारवाई करत ते जमीनदोस्त करण्यात येत आहेत.

पहिल्या टप्प्यात पीएमआरडीएच्या संयुक्त कारवाईमध्ये पुणे शहर पोलिस, पिंपरी-चिंचवड पोलीस, पुणे ग्रामीण पोलिस, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमआयडीसी, महावितरण आदी विभागांमार्फत ३ ते १३ दरम्यान २५०० पेक्षा अधिक अतिक्रमणांवर कारवाई केली. यासह अनेक स्थानिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. 

महामार्ग व राज्यमार्ग रस्त्यालगत असणाऱ्या दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी व अनधिकृत बांधकामे काढण्यात आली आहेत. पुढील टप्प्यामध्ये संयुक्त कारवाई ही पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे महामार्ग व रस्त्यांवर होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिक्रमण कारवाई १७ ते ३० मार्च २०२५ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे पीएमआरडीए, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील अतिक्रमण धारकांनी स्वत: अतिक्रमणे काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे, यासह कोणतेही बांधकाम पूर्वपरवानगी घेऊनच करावेत, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

१७ ते ३० मार्च दरम्यान होणारी कारवाई 

-पुणे–सातारा रस्ता (नवले पूल ते सारोळे).
-सुस रस्ता.
-हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट.
-नवलाख उंब्रे ते चाकण.
-हिंजवडी परिसर – माण.
-तळेगाव – चाकण – शिक्रापूर.

३ ते १३ मार्च दरम्यान झालेली कारवाई

-पुणे–नाशिक महामार्गावरील चिंबळी (बर्गेवस्ती) ते सांडभोरवाडीपर्यंत २९ किलोमीटर परिसरात ८९८ अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे पाडली. त्याचे क्षेत्रफळ ८९८०० चौरस फूट आहे.
-पुणे-सोलापूर रस्त्याच्या दुतर्फा ३३ किलोमीटर परिसरात १०४७ स्ट्रक्चर्सवर कारवाई केली. त्याचे क्षेत्रफळ १०४७०० चौरस फूट आहे.
-चांदणी चौक ते पौड रस्त्याच्या बाजूस २१ किलोमीटर परिसरात ५५७ स्ट्रक्चर्सवरील कारवाई क्षेत्रफळ ५५७०० चौरस फूट आहे.

Web Title: PMRDA to 'hammer' again from Monday; action against more than 2500 encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.