लोणावळ्यातील स्मशानभुमीत कवींनी जागविली रात्र
By admin | Published: April 1, 2017 01:40 AM2017-04-01T01:40:44+5:302017-04-01T01:40:44+5:30
बंडखोर सांस्कृतिक आंदोलन यांच्या वतीने सोमवारी सोमवती अमावास्येच्या रात्री कैलासनगर स्मशानभूमी, लोणावळा
लोणावळा : बंडखोर सांस्कृतिक आंदोलन यांच्या वतीने सोमवारी सोमवती अमावास्येच्या रात्री कैलासनगर स्मशानभूमी, लोणावळा येथे विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन केले होते. या विद्रोही कविसंमेलनात विविध कवींनी सहभाग घेऊन काव्य सादर केली. काव्यरसिकांनी चांगली उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्मशान व अमावास्या हे दोन्हीही तसे वर्ज्यच मानले जाते. त्यामुळे अंत्यसंस्काराव्यतिरिक्त माणसे स्मशानाकडे वळत नाहीत. जनमाणसातील या अज्ञान व अंधश्रद्धेच्या परंपरा मोडीत काढत विद्रोही कवी साहित्यिकांनी या संमेलनात क्रांतिकारी कवितांतून बंडखोरी व सांस्कृतिक आंदोलन केले. जिवंत माणसांच्या संवेदना बोथट झाल्या असून, समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार, बेरोजगारी, शोषण व विषमतेच्या विरोधात हुंकार उमटत नाहीत. त्यामुळे जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन वंचितांमध्ये न्याय्य हक्काची जाणीव निर्माण करण्यासाठी विद्रोही कविसंमेलने ठिकठिकाणी झाली पाहिजेत, अशी अपेक्षा संमेलनाचे उद्घाटक पत्रकार दादासाहेब यादव यांनी व्यक्त केली. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पॅन्थर नेते मुरलीधर जाधव, तसेच डॉ. जिभाऊ बच्छाव यांनी कवींच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कविसंमेलनामध्ये जयवंत पवार, वसंत तुमकार, शाहीर सचिन कांबळे, रमेश ओव्हाळ, ज्ञानेश्वर सोनवणे, सचिन भवार, अमित जुगदर, आकाश तोरणे, सुवर्णा भवार, वाघमारे, अॅड. महेंद्रकुमार लोखंडे, आर. डी. जाधव, प्रफुल्ल रोकडे, किशोर कर्डक, कुशल वाघमारे, अॅड.संतोष कोकाटे आदींनी वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधनात्मक कविता सादर केल्या. शाहीर सचिन कांबळे यांनी सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले. या संमेलनामध्ये प्रत्येक अमावास्येच्या रात्री वेगवेगळ्या स्मशानभूमींत कविसंमेलन घेतले जावे, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. संमेलनादरम्यान कैलासधाम स्मशानभूमीमध्ये मानवतेची नि:स्वार्थ सेवा देणारे प्रेम उठवाल यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचा शेवट शाहीर कांबळे यांच्या भैरवी गीताने झाला. रमेश ओव्हाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर यादव यांनी आभार मानले. (वार्ताहर)