पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: April 14, 2025 22:27 IST2025-04-14T22:27:45+5:302025-04-14T22:27:45+5:30
संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरीत १२ श्वानांवर विषप्रयोग; तीन श्वानांचा मृत्यू
पिंपरी : अज्ञात व्यक्तींकडून १२ श्वानांवर विषप्रयोग करण्यात आला. यापैकी तीन श्वानांचा मृत्यू झाला. तर सहा श्वानांची प्रकृती गंभीर आहे. पिंपरी येथील महिंद्रा ॲनथिया सोसायटीच्या आवारात रविवारी (दि. १३) रात्री साडेदहा ते सोमवारी (दि. १४) सकाळी साडेआठ या कालावधीत ही घटना घडली.
प्रिया बाबुलाल गुगळे (४१, रा. महिंद्रा ॲनथिया सोसायटी, पिंपरी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. १४) संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३२५ अन्वये प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (सी) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील महिंद्रा ॲनथिया सोसायटी ही उच्चभ्रू सोसायटी मानली जाते. रविवारी रात्री साडेदहा ते सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने १२ श्वानांना काहीतरी विषारी पदार्थ खाण्यास दिला. त्यामुळे तीन श्वानांचा मृत्यू झाला. इतर सहा श्वानांची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेनंतर श्वानप्रेमी व प्राणिमित्रांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. अधिक तपासानंतरच हा प्रकार कोणी केला हे स्पष्ट होईल, असे संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी सांगितले.