तळेगाव दाभाडे येथील महाविद्यालयावर प्रशासनाची कारवाई ; नियमांचे उल्लंघन करत परीक्षेचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 01:10 PM2020-06-12T13:10:06+5:302020-06-12T17:19:19+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून परीक्षा सुरु ..
तळेगाव दाभाडे: राज्यात कोरोनाच्या काळात परीक्षा घेण्यावरून राज्य सरकार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात मोठा वादंग सुरु आहे. त्यात शिक्षण विभाग, विद्यापीठे ,शैक्षणिक संस्था, तज्ञ,पालक यांच्यात परीक्षा घेण्यावरून मतमतांतरे आहेत. सध्या तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश आणि राज्यात शैक्षणिक परीक्षा घेण्यास सक्त मनाई आहे. मात्र, तळेगाव दाभाडे येथील स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्ट संचलित ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून परीक्षा सुरु होती. याप्रकरणी संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरावी कॉमर्सच्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा आयटी विषयाचा पेपर होता. २७ विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. प्रशासन आणि पोलिसांना ही माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना घरी जाण्याचा आदेश देत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे, सचिव किशोर राजस, उपाध्यक्ष गनिमिया सिकिलकर, खजिनदार शिवाजी आगळे, संचालक सुनील कडोलकर, सुरेश चौधरी, सुभाष खळदे, अशोक काळोखे, संजय काळोखे, मुख्याध्यापिका हेलन अँथोनी, पर्यवेक्षक दीपक खटावकर, पर्यवेक्षक संजय काजळे, वैभवी अवचट, सपना धोत्रे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
कोविड-१९ साथीच्या आजाराच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या आदेशाचा भंग केला असल्याचा गुन्हा नोंदविला. यासंदर्भात सहायक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे यांनी फिर्याद दिली. आयटी विषयात नापास झालेल्या २७ विद्यार्थ्यांची तीन वर्गखोल्यात परीक्षा चालू होती. शाळेच्या एसवायजेसी लेक्चर्स या व्हॉट्सअॅप ग्रुपवर परीक्षेचे वेळापत्रक टाकले होते. गुरुवारी नापास विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची परीक्षा झाली होती. शुक्रवारी आयटी विषयाची परीक्षा आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी शुक्रवारी सकाळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे, तलाठी विजय साळुंखे, पोलीस हवालदार दिलीप कदम, प्रशांत वाबळे, महेंद्र रावते, अमोल गोरे, सतीश मिसाळ, विनोद पाटोळे यांच्या पथकासह ही कारवाई केली.
केवळ विद्यार्थ्यांची मागणी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत तीन वर्गखोल्यांतून २७ विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. नापास झालेले विद्यार्थी आणि पालकांची परीक्षा घेण्याबाबत आग्रही मागणी होती. विद्यार्थीहित सांभाळून, सॅनिटायझरचा वापर करीत, फिजिकल डिस्टन्सिंग पाळत परीक्षा घेतली. -चंद्रकांत शेटे, अध्यक्ष, स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्ट