Pimpri-Chinchwad: शहरात डंपर, मिक्सरच्या बेशिस्त चालकांवर ‘बडगा’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 06:04 PM2021-12-22T18:04:50+5:302021-12-22T18:23:47+5:30
वाहतूक सुरळीत करण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे
पिंपरी : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होत आहे. नियमांचे उल्लंघन करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या डंपर व मिक्सर, अशा ३७२ वाहनांवर कारवाई केली. त्यात तीन लाखांवर दंड आकारण्यात आला. विशेष मोहीमेंतर्गत सोमवारी (दि. २०) ही कारवाई करण्यात आली.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यात पोलिसांकडून शहरातील मुख्य रस्ते व चौकांत वाहतूक नियमन केले जात आहे. तसेच वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे दंड वसुली देखील होत आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ई-चलानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होत आहे. अवजड वाहने शहरात गर्दीच्या वेळेत भरधाव तसेच बेशिस्तपणे चालवून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जातो. तसेच अपघातही होतात. या प्रकारांना आळा बसावा म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून डंपर व मिक्सर यासारख्या अवजड वाहनांच्या बेशिस्त चालकांवर कारवाई केली जात आहे.
वाहन तपासणीसाठी विशेष मोहीम
विशेष मोहीम राबवून वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात वाहनचालकांचे लायसन्स, वाहनाचे कागदपत्र यांची पाहणी केली जात आहे. तसेच नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणे, दादा, मामा असे लिहून नंबरप्लेटमध्ये बदल करणे, रिफ्लेक्टर सुस्थितीत नसणे, अशा डंपर व मिक्सरवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
वाहतूक पोलिसांनी सोमवारी केलेली कारवाई
वाहन - केसेस - दंड (रुपये)
डंपर - २९० - २,३६,२७०
मिक्सर - ८२ - ७१,८००
वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन अपघात टाळणे शक्य होणार आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वाहनांची तपासणी करून दंड वसुलीवर भर देण्यात येणार आहे.
- आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड