पिंपरी-चिंचवड पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये; कोरोना निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी १६ भरारी पथके

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 05:48 PM2022-01-10T17:48:44+5:302022-01-10T17:56:16+5:30

दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रवेशाला मनाई आहे

police in action mode 16 flying squads to enforce corona restrictions | पिंपरी-चिंचवड पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये; कोरोना निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी १६ भरारी पथके

पिंपरी-चिंचवड पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये; कोरोना निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी १६ भरारी पथके

Next

पिंपरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये असून, महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरासाठी १६ भरारी पथके स्थापन केली आहेत. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर या पथकांकडून कारवाई होणार आहे. विनामास्क फिरल्यास ५०० रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. 

मुंबई, पुणे पाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. कडक निर्बंध लागू केले असून जमावबंदी व संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडून गर्दी करीत असल्याचे दिसून येते. रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दरम्यान ओमायक्राॅन पाठोपाठ कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 

नागरिकांनी निर्बंधांचे पालनक करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. एक पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी अशा पाच जणांचे एक पथक राहणार आहे. प्रत्येक पथकाने त्यांच्या हद्दीत पाहणी करण्यात येणार आहे. निर्बंधांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास या पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे.  

उघड्यावर थुंकणे पडणार महागात

काही बेशिस्त नागरिक मास्कचा वापर न करता शहरात वावरत असल्याचे दिसून येते. तसेच काही जण उघड्यावर बिनदिक्कत थुंकतात. विनामास्क प्रकरणी ५०० रुपये तर उघड्यावर थुंकल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. भरारी पथकांसह स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस यांच्याकडून देखील ही कारवाई करण्यात येणार आहे. 

दोन डोस घेतले नसल्यास...

दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रवेशाला मनाई आहे. सार्वजनिक वाहनांनी प्रवासाला बंदी आहे. या नागरिकांना हाॅटेल, दुकाने, तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी देखील प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच त्यांना दुसरा डोस घेण्याचे आवाहन करण्यात यावे, अशी सूचना देखील पोलिसांना देण्यात आली आहे.  

कडक कारवाईच्या सूचना

शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात यावी, तसेच बेशिस्त वाहनचालक, विनामास्क फिरणारे नागरिक यांना दंड आकारावा. त्याचप्रमाणे गर्दी करून जमावबंदीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई करावी, अशा सूचना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

Web Title: police in action mode 16 flying squads to enforce corona restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.