पोलीस पाटील उरले फक्त नावापुरते

By Admin | Published: May 10, 2017 04:02 AM2017-05-10T04:02:56+5:302017-05-10T04:02:56+5:30

पोलीस व नागरिकांमधील दुवा असलेल्या पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्षांकडून अपेक्षित जबाबदारी पार पाडली जात नाही

The police are only for the sake of the police | पोलीस पाटील उरले फक्त नावापुरते

पोलीस पाटील उरले फक्त नावापुरते

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उर्से : पोलीस व नागरिकांमधील दुवा असलेल्या पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्षांकडून अपेक्षित जबाबदारी पार पाडली जात नाही. ही पदे निर्माण करण्याचा शासनाचा हेतूच सफल होत नाही. त्याचबरोबर नागरिकांच्या विश्वासालाही तडा जात आहे. या दोन्ही पदांकडून अपेक्षाभंग होत असल्यामुळे नागरिकांकडून न्यायासाठी प्रथम न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे प्रमाण वाढले आहे.
अलीकडे पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षांची ग्रामस्थांपेक्षा स्थानिक पोलिसांशी जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. पूर्वी गावकीच्या राजकारणामध्ये पोलीस पाटलाचा मान मोठा असायचा. आता तशी स्थिती नसली, तरी पाटीलकीसाठी मोठी रस्सीखेच होते. पोलीस पाटील हे खूप वर्षांपासून चालत आलेले पद. पूर्वी पाटलाचा गावात दरारा असायचा. पोलिसांसारखी त्यांच्याबाबत ग्रामस्थांच्या मनात भीती असायची. ते न्यायबुद्धीने गावातील तंट्यांचा निवाडा करीत असल्याने अनेक तंटे गावातच मिटत. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी ते घेत असल्याने त्यांच्या न्यायनिवाड्यावर कोणी आक्षेप घेत नसत. त्यांचा शब्द गावात अंतिम मानला जात असल्याने गावातील भांडणे त्यांच्या मदतीने सहज मिटली जायची. पोलीस पाटील हे पद पूर्वी घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा प्रकार होता. आजही त्यात फारसा फरक पडला आहे असे म्हणता येणार नाही. वास्तविक बदलत्या काळात पोलिस पाटलांवर अधिक जबाबदाऱ्या आल्या आहेत. गावात बंदोबस्त ठेवणे, वरिष्ठांच्या कामात साहाय्य करणे, गावातील माहिती ठेवणे आदीसोबतच त्याच्या कामाच्या कक्षा वाढून शांतता व सुव्यवस्था यासोबत सामाजिक सुरक्षितता प्रस्थापित करताना दुर्बल घटकाप्रति न्यायाचा प्रवाह वळविण्याची जबाबदारी पोलीस पाटलावर असते. कालांतराने माणसे बदलत गेली. गावातील वातावरण बदलले. शिक्षणाचा फायदा लोकांना होत गेल्याने लोकांना कायदा व त्याचे महत्त्व समजू लागले.काळाबरोबरच पोलीस पाटीलही बदलत गेला.गावातील काही तंट्यामध्ये पोलीस पाटलाची भूमिका समतोल नसल्याने ग्रामस्थ पोलिसांकडे, कोर्टात जाऊ लागले. सध्या तालुक्यातील पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्ष यांच्यात दुरावा वाढला आहे.
अलीकडे पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्ष यांची पोलिसांशी जवळीक आणि ग्रामस्थांशी दुरावा वाढल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. अर्थात चांगले काम करणारे पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्षही आहेत. मात्र, कारण नसताना हस्तक्षेप करणे, लक्ष देणे, एकाच्या बाजूने बोलणे, काही बाबतीत माहिती न देण्याचे प्रकार घडत आहेत.

Web Title: The police are only for the sake of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.