पोलिसांना गुंगारा देणारे दोन सराईत जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 06:14 PM2019-07-21T18:14:09+5:302019-07-21T18:19:26+5:30
निगडी पोलीसांना पाहिजे असलेले सराईत व १ वषार्पासून गुंगारा देणारे लखन सातव व त्याचा साथीदार नितीन चंदनशिवे ओटास्किम येथे थांबलेले आहेत.
पिंपरी : पोलिसांना एक वर्षापासून गुंगारा देणाऱ्या दोन सराईत आरोपींना जेरबंद केले आहे. निगडीतील ओटास्किम येथे खंडणी दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. आरोपींवर विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन ऊर्फ विकास कैलास सातव (वय २२, रा. दळवीनगर, ओटास्किम, निगडी) व नितीन महावीर चंदनशिवे (वय २३, रा. रूपीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
खंडणी - दरोडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती प्राप्त करीत होते. त्यावेळी पोलीस नाईक शैलेश सुर्वे यांना माहिती मिळाली की, निगडी पोलीसांना पाहिजे असलेले सराईत व १ वषार्पासून गुंगारा देणारे लखन सातव व त्याचा साथीदार नितीन चंदनशिवे ओटास्किम येथे थांबलेले आहेत. त्यानुसार सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली. आरोपी लखन सातव याने शरीराविरूध्दचे ३ गुन्हे व आर्म अक्टचा १ गुन्हा केल्याची माहिती दिली. आरोपी नितीन चंदनशिवे याने शरीराविरूध्दच्या २ गुन्ह्यात फरार असल्याबाबत सांगितले.
आरोपी लखन सातव याच्यावर यापूर्वी निगडी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे ५ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी नितीन महावीर चंदनशिवे याच्याविरोधात यापूर्वी निगडी, सांगवी व चिखली पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. बढे, हवालदार अजय भोसले, पोलीस नाई उमेश पुलगम, शैलेश सुर्वे, किरण काटकर, आशिष बोटके व सागर शेडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.