दरोड्याच्या तयारीतीलआरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 12:33 PM2019-01-10T12:33:14+5:302019-01-10T12:34:37+5:30
गुन्हे शाखेच्या पथकाने भोसरी हद्दीत पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींपैकी तिघांना ताब्यात घेतले.
पिंपरी : गुन्हे शाखेच्या पथकाने भोसरी हद्दीत पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींपैकी तिघांना ताब्यात घेतले. उर्वरित दोन मात्र त्यांना चकवा देत पसार झाले. ही कारवाई बुधवारी रात्री दोनच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडेवाडी, राजमाता जिजाऊ महाविद्यालयाजवळ एक मोटार घेऊन पाचजण संशयास्पदरित्या थांबल्याचे आढळुन आले. त्यांच्याकडील मोटारीची झडती घेतली असता, तलवार, कोयता, मास्क, मिरची पुड असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. मंगेश शुक्राचार्य मोरे (वय २१,रा. भोसरी), आकाश अशोक राठोड (वय २४,भोसरी), दत्ता उत्तम पवार (वय २०) या आरोपींना दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली तर सागर वाडाने (भोसरी), अमित शेकापुरे हे दोन आरोपी पसार झाले. गुन्हे शाखेच्या खंडणी व दरोडा विरोधी पथकाने बुधवारी कारवाई केली. पोलीस पथकाने बुधवारी सुमारे चार लाख रुपये किंमतीची मोटार (एमएच १२, पी क्यू १८१३) तसेच या मोटारीत ठेवलेले दरोड्याचे साहित्य तलवार, पालघन, मिरची पूड हे सर्व साहित्य ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे नितीन आप्पा खेसे यांनी या प्रकरणी आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे.