छोटा राजनच्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 10:05 PM2019-05-22T22:05:49+5:302019-05-22T22:09:14+5:30

आरोपींकडून २ गावठी पिस्तुलं व ५ जिवंत काडतुसं जप्त

police arrested three persons with chhota rajans social organisations designate | छोटा राजनच्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

छोटा राजनच्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

googlenewsNext

पिंपरी : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. छोटा राजनच्या सीआर सामाजिक संघटनेचा मावळ तालुका संपर्क प्रमुखाचा यात समावेश आहे. गुन्हे शाखा युनिट एकने मंगळवारी (दि. २१) ही कारवाई केली. आरोपींकडून २ गावठी पिस्तुले व ५ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरण बाळासाहेब ठाकर (वय २६, रा. दारुंब्रे, ता. मावळ), प्रदीप शिवाजी खांडगे (वय २८, रा. पांगरी, ता. खेड) व राजू शिवलाल परदेशी (वय ५९, रा. दत्तवाडी, कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) यांना अटक केली आहे. 

आळंदी येथे केळगाव रोडवर एक जण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून चरण ठाकर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, प्रदीप खांडगे याच्याकडून पिस्तूल विकत घेतल्याचे त्याने सांगितले. यानंतर पोलिसांनी शोध घेऊन प्रदीप खांडगे यालाही अटक केली. मध्यप्रदेशातून दोन पिस्तूल आणल्याचे खांडगे याने चौकशीदरम्यान सांगितले. त्यातील एक पिस्तूल ठाकर आणि एक पिस्तूल परदेशी यांना विकल्याचे खांडगे याने सांगितले. त्यानुसार राजू परदेशी याला अटक करून त्याच्या घरातून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. 

आरोपी चरण ठाकर याच्याविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या अखिल भारतीय सेनेचा तो माजी मावळ तालुकाध्यक्ष आहे. तसेच छोटा राजन सामाजिक संघटनेचा मावळ तालुका संपर्क प्रमुख आहे. प्रदीप खांडगे याच्यावरही गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, प्रमोद वेताळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 

Web Title: police arrested three persons with chhota rajans social organisations designate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.