गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने भररस्त्यात पकडली 'पीएसआय'ची कॉलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 12:01 PM2021-09-27T12:01:46+5:302021-09-27T12:12:49+5:30
पिंपरी : वाहतुकीस अडथळा होत असलेली गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने गणवेशातील पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर पकडली. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी ...
पिंपरी : वाहतुकीस अडथळा होत असलेली गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने गणवेशातील पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर पकडली. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मोटादेवी मंदिराच्या जवळ कैलासनगर, थेरगाव येथे रविवारी (दि. २६) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली. नरेश पारख (वय ४०) व धर्मेंद्र पारख (वय ४०, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप हे दखलपात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट देऊन साक्षीदारांचा तपास करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची गाडी रस्त्यामध्ये लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे ते वाहन रस्त्याच्या कडेला घेण्याबाबत फिर्यादी समज देत होते. त्यावेळी फिर्यादीने पोलिसांचा शासकीय गणवेश परिधान केला होता. असे असतानाही आरोपींनी फिर्यादीच्या गणवेशाची कॉलर पकडून घटनास्थळी भेट देण्यापासून फिर्यादीला परावृत्त केले. तसेच आरोपींनी शासकीय कामात अडथळा केला.