बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तरुणावर कारवाई केल्यामुळे पोलिसाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 08:00 PM2020-01-28T20:00:36+5:302020-01-28T20:02:24+5:30
अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन नोकरी घालवण्याची दिली धमकी
पिंपरी : मोटारीतून बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तरुणावर कारवाई केल्याप्रकरणी तरुणाच्या वडिलांनी कारवाई करणाऱ्या फौजदाराला धक्काबुक्की केली. तसेच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन नोकरी घालवण्याची धमकी दिली आणि सरकारी कामात अडथळा आणला. ही घटना रविवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास गणेशनगर बोपखेल येथे घडली.
दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फौजदार कुणाल बालाप्रसाद कुरेवाड यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेंद्र रवींद्र वाघमारे (वय ४५, रा. रामनगर, बोपखेल) याला अटक केली आहे. फियार्दी कुरेवाड यांना आरोपी महेंद्र याचा मुलगा स्वप्नील वाघमारे (वय २१) हा इनोवा मोटारीतून दारू विक्री करत असताना आढळला. त्यावरून त्याला ताब्यात घेतले आहे. या कारणावरून आरोपी महेंद्र वाघमारे यांनी आरडाओरडा केला. माझी गाडी व मुलाला का ताब्यात घेतले, असे विचारत पोलीस फौजदार कुरेवाड यांच्या अंगावर धावून येत धक्काबुक्की व शिवीगाळ केली. फौजदार कुरेवाड हे महेंद्र यांना समजून सांगत असताना मी तुमची नोकरी घालवू शकतो. तुमच्यावर अ?ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करतो.' अशी धमकी दिली आहे.