Police Bharti: पोलीस भरतीची लेखी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 10:47 AM2021-10-20T10:47:40+5:302021-10-20T10:49:47+5:30
लेखी परीक्षेचे परीपूर्ण नियोजन होऊ न शकल्याने ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलावी लागली. परीक्षेसाठी राज्यभरातून परीक्षार्थी येणार आहेत (police bharti)
पिंपरी : पोलीस भरतीसाठी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून १७ ऑक्टोबरला लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. त्यानंतर २३ ऑक्टोबरला लेखी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र एक लाख ८९ हजार ७३२ परीक्षार्थी असल्याने नियोजन करणे सहज शक्य होत नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही लेखी परीक्षा तुलसी विवाहाच्या मुहूर्तावर अर्थात शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यातील ७२० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी एक लाख ८९ हजार ७३२ जणांचे अर्ज आले. मात्र गेल्या वर्षी कोरोना महामारी व लॉकडाउनमुळे ही प्रक्रिया रखडली. दरम्यान, राज्यातील इतर शहर व ग्रामीण पोलीस दलांकडून परीक्षा घेण्यात आली. मात्र पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची लेखी परीक्षा प्रलंबित राहिल्याने अर्जदार उमेदवारांना प्रतीक्षा होती. त्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. तसेच परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी एका त्रयस्थ खासगी कंपनीकडे देण्यात आली. मात्र परीक्षार्थी पावणे दोन लाखांपेक्षा जास्त असल्याने परीपूर्ण नियोजन करणे शक्य झाल्याचे दिसून येत नाही.
लेखी परीक्षेसाठी तिस-यांदा ‘तारीख’-
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेची १७ ऑक्टोबर ही तारीख जाहीर केली होती. मात्र इतर घटकांकडून त्याच दिवशी परीक्षा होणार असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. त्यासाठी परीक्षा पुढे ढकलून २३ ऑक्टोबरला घेण्याचे निश्चित केले. मात्र परीपूर्ण नियोजन न झाल्याने ही लेखी परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून १९ नोव्हेंबर २०२१ रोजी परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थ्यांना भुर्दंड-
लेखी परीक्षेचे परीपूर्ण नियोजन होऊ न शकल्याने ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलावी लागली. परीक्षेसाठी राज्यभरातून परीक्षार्थी येणार आहेत. त्यासाठी त्यांना प्रवासाचे, राहण्याचे नियोजन करावे लागते. हजारो परीक्षार्थ्यांनी त्याचे नियोजन केले होते. मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने त्यांची अडचण झाली आहे. त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
आयुक्तालयात भरण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई पदाच्या जागा
सर्वसाधारण - १७६
महिला - २१६
खेळाडू - ३८
प्रकल्पग्रस्त - ३८
भूकंपग्रस्त - १४
माजी सैनिक - १०७
अंशकालीन पदवीधर - ७१
पोलीस पाल्य - २२
गृहरक्षक दल – ३८
परीक्षार्थींची संख्या जास्त असल्याने त्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत नियोजन केले जात आहे. परीक्षार्थींना त्यांच्या सोयीचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक परीक्षार्थ्याला हॉलतिकिट, परीक्षा केंद्र, याबाबत अचूक माहिती देण्यात येणार आहे. त्याचे परीपूर्ण नियोजन करता यावे म्हणून संबंधित व्हेंडार कंपनीने वेळ वाढवून मागितली. त्यानुसार १९ नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे.
- डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड