वाहतूक सुरळीत न करता दंडाची पावती फाडण्यातच पोलीस व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:52 AM2019-01-15T00:52:28+5:302019-01-15T00:52:50+5:30
वॉर्डन करतात वाहन तपासणी : पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी परिसरातील स्थिती
- शिवप्रसाद डांगे
रहाटणी : सध्या शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने त्याचा ताण वाहतूक पोलिसांवर येत आहे. तो कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला ट्रॅफिक वॉर्डन काही वर्षांपासून दिले आहेत. मात्र सध्या ट्रॅफिक वॉर्डनचा उपयोग वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा इतर कामांसाठी होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
सिग्नलवर उभ्या चालकांचा परवाना, पीयूसी तपासणे, वेळप्रसंगी दंड आकारणे ही कामे सर्रास ट्रॅफिक वॉर्डन करताना दिसून येत आहेत. मात्र या सर्व प्रकारात रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी परिसरात वाहतूक कोंडीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. ट्रॅफिक वॉर्डनचे नेमके काम काय? वाहनांची तपासणीचे अधिकार नेमके कोणाला वाहतूक पोलिसांना की वॉर्डनला हा प्रश्न सर्वसामान्य वाहन चालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
एखादा माल वाहतूक टेम्पो, ट्रक आला व तो कितीही वाहतुकीत असला, तरी मागच्या-पुढच्या वाहनांचा विचार न करता त्याला बाजूला घेण्यासाठी वाहतूक पोलीस व वॉर्डन जिवाचा आटापिटा करताना दिसून येतात. असाच प्रकार काळेवाडी फाटा येथे अगदी वळणावरील रिक्षाथांब्यावर दिसून आला. रिक्षा थांब्याजवळ वाहतूक पोलीस व वॉर्डन वाहन अडविण्याचे काम करीत होते. त्यामुळे मागच्या वाहनांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत होते. काळेवाडी फाटा येथे अगदी वळणावरच रिक्षा आहे त्याच ठिकाणी वाहतूक पोलीस व वॉर्डन वाहन आडविण्याचे काम करीत होते त्यामुळे मागच्या वाहनांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत होते .
काळेवाडी फाटा येथे सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करून वाहने अडविण्यासाठी एका बाजूला उभे होते. त्यामळे अनेक वाहने सिग्नल तोडून जात होते. असे असतानाही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत होते. दुचाकी अडवत होते. वाहने अडविण्याचे काम ठरल्यासारखे ट्रॅफिक वार्डन करताना दिसून आले. काही दिवसांपासूूून शिवार चौकात सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या चौकात वहातुक पोलिस वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा वाहने अडविण्यावर भर देत असल्याचे दिसून येते.
अनेक वेळा ट्रॅफिक वॉर्डन वाहनांची तपासणी करून संबंधित वाहनचालकांना पोलिसाकडे पाठवितो. नेहमी या चौकात तीन ते चार पोलीस व दोन ते तीन ट्रॅफिक वॉर्डन नित्यनियमाने असतात. अनेक वेळा हे सर्वजण शिवार चौकाकडून औंधकडे वळणाच्या कडेला उभे असतात. त्यामुळे वाहन वळविताना वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. वाहतूक पोलीस वाहन तपासणीशिवाय काही करत नाहीत. तपासणीसाठी अडविलेली वाहने रस्त्याच्या मधोमध उभी असतात. त्यामुळे इतर वाहनांना रस्ता मिळत नाही. पोलिसांना काही बोलले, तर लगेच वाहन बाजूला घेण्यास सांगितले जाते.
पोलिसांपेक्षा वॉर्डनचीच अरेरावी जास्त
४वाहतूक पोलीस फक्त चौकाच्या एका कोपऱ्यात उभे राहून दंडाची पावती फाडण्याचे काम करीत असतात. मात्र ट्रॅफिक वॉर्डन वाहन अडविणे, वाहन चालविण्याचा परवाना, पीयूसी यासह इतर कागदपत्रांची तपासणी करणे, वाहन पोलिसांच्या ताब्यात देणे ही मुख्य भूमिका वॉर्डन पार पाडताना दिसून येत आहेत. एखादा वाहनचालक मागितलेले कागदपत्र देण्यास टाळाटाळ केल्यास किंवा तुला काय अधिकार अशी विचारणा केल्यास काही वेळा तर वाहनाची चावी काढून घेतली जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनचालक व वॉर्डन यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे ‘भिक नको पण कुत्रं आवर’ म्हणण्याची वेळ वाहनचालकावर येत आहे. एखाद्या वाहनाचा किती दंड आकारायचा तेसुद्धा ट्रॅफिक वॉर्डन ठरवीत आहेत.
वाहनचालकांना धरले जाते वेठीस
गेल्या काही दिवसापासून कोकणे चौक, शिवार चौक, गोविंद यशदा चौक, स्वराज गार्डन चौक, रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा, तापकीर चौक यासह ज्या ठिकाणी वाहतूक पोलीस व वॉर्डन यांना वाहतुकीचे नियमन करण्याची जवाबदारी देण्यात येते त्या ठिकाणि सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना बाजूला घेऊन वाहनांची तपासणी करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र नियम तोडणाºयांकडे व वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या-ना-त्या कारणाने दंडाची पावती फाडत वाहन चालकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत.
भरधाव वाहनांना अडविण्याचा खटाटोप
गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीचे नियम तोडणाºया वाहनचालकांवर सर्रास दंडात्मक कारवाई करताना वाहतूक पोलीस शहरातील अनेक चौकांमध्ये ठिकठिकाणी दिसून येत आहेत. काही वेळा एखादा वाहनचालक सिग्नलला उभा असेल, तर त्याला बाजूला घेऊन त्याच्याकडे परवाना, पीयूसी यासह इतर कागदपत्रांची तपासणी केली जाते. मात्र ही तपासणी ट्रॅफिक वॉर्डन करीत असल्याचे सर्रास दिसून येत आहे. बहुतांश वेळा भरधाव वाहनाला अडविले जाते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. हा प्रकार पिंपळे सौदागर येथील शिवार चौक, तापकीर चौक, काळेवाडी फाटा या चौकांमध्ये दिसून येत आहे.
आयुक्तांच्या आदेशाचा पडला विसर
सिग्नलवरील चालकांना हेल्मेट नाही, पीयूसी नाही म्हणून दंड करण्यापेक्षा विरुद्ध दिशेने वाहन चालवून स्वत:सह दुसºयाच्या जिवाला धोका पोहोचविणाºया वाहनचालकांवर जबर कारवाई करा, तसेच एका दुचाकीवर तीन प्रवासी सवारी करणाºया हुल्लडबाजांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत. मात्र याचा विसर वाहतूक पोलिसांना पडला असल्याचे दिसून येत आहे.