वडील अमेरिकेत अडकल्याने पोलिसांनीच साजरा केला मुलाचा वाढदिवस..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 06:03 PM2020-04-27T18:03:33+5:302020-04-27T18:05:28+5:30
आपला हा वाढदिवस आपण कधीही विसरणार नाही...
पिंपरी : लॉकडाऊनमुळे अनेक जणांना आपला वाढदिवस घरातच साजरा करावा लागत आहे. घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून कारवाई होत आहे. मात्र हेच पोलीस जेव्हा केक घेऊन येतात आणि वाढदिवस साजरा करतात तेव्हा आनंदाला पारावार राहत नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवून देतानाच सर्वसामान्यांच्या सुखदु:खात सहभागी होत आहेत. असाच एक प्रसंग सांगवी येथील नागरिकांना अनुभवण्यास मिळाला.
लॉकडाऊनमुळे अमेरिकेत अडकलेल्या वडिलांनी मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला. मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची विनंती त्यांनी ई-मेलव्दारे केली. त्यानुसार रविवारी सायंकाळी त्या मुलाच्या घरी जाऊन केक कापत पोलिसांनी शुभेच्छा दिल्या.
वत्सल शर्मा असे वाढदिवस साजरा करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वत्सल याचे वडील अमेरिकेत अडकलेले आहेत. वत्सल याचा रविवारी वाढदिवस होता. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना आपला मुलगा वत्सल याला शुभेच्छा देता येत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी पिंपरी - चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला. याबाबत सांगवी पोलिसांना माहिती देण्यात आली.
सांगवी पोलिसांनी वत्सल याच्या वाढदिवसाची जोरदार तयारी केली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलीस पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीत असलेल्या वत्सलच्या घरी गेले. वडिलांचा वाढदिवसाचा मेसेज वत्सला याला दिला. तसेच त्याला इमारतीच्या पार्किंगमध्ये बोलावून पोलिसांच्या गाडीवरच केक कापत वाढदिवस साजरा केला. यावेळी सोसायटीतील नागरिकही यात सहभागी झाले.
पोलिसांनी अशा अत्यंत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. त्यामुळे वत्सल भारावून गेला होता. वडिलांसह पोलिसांचेही त्याने आभार मानले. आपला हा वाढदिवस आपण कधीही विसरणार नाही, अशी भावना त्याने पोलिसांकडे व्यक्त केली.