पोलिसांच्या मुलांनीही संधींचा फायदा घेऊन यशस्वी उद्योजक व्हावे : कृष्ण प्रकाश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 11:18 AM2020-11-25T11:18:52+5:302020-11-25T11:19:42+5:30
नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बहुतांशवेळ घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांचे स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष होते.
पिंपरी : पोलिसांच्या मुलांनी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. त्यासाठी संधींचा फायदा घेऊन यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी समाजासमोर यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.
पोलिसांच्या मुलांना उद्योजक बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पुढाकार घेतला आहे. या मुलांना योग्य दिशा देण्यासाठी उद्योजकता परिचय कार्यशाळेचे चिंचवड येथे मंगळवारी आयोजन केले होते. पिंपरी- चिंचवड पोलीस, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर आदी या वेळी उपस्थित होते.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बहुतांशवेळ घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांचे स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष होते. मुलांचे शिक्षण आणि रोजगार किंवा स्वयंरोजगार याबाबत उपाययोजना करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. त्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील पोलिसांच्या पाल्यांना स्वतःच्या पायावर उभे करून रोजगार देण्यासाठी पोलीस आयुक्तांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.
उद्योजकता उपक्रमांतर्गत पोलिसांच्या पाल्यांना स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. बँकेच्या माध्यमातून ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊन त्यावर १५ ते ३५ टक्के अनुदान देखील आहे. या संधींचा फायदा घेऊन औद्योगिकनगरीत पोलिसांची मुले स्वतः उद्योजक होऊन इतरांना रोजगार देतील, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.