वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:48 AM2018-09-01T00:48:43+5:302018-09-01T00:49:08+5:30
कर्मचाऱ्यांची नियुक्ती : देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्त्यावरील पुनावळेचा भुयारी मार्ग
रावेत : देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्त्यावरील पुनावळे येथील भुयारी मार्गात सातत्याने वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत या भुयारी मार्गाजवळ वाहतूक नियमनासाठी हिंजवडी वाहतूक विभागाकडून पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिवसरात्र शेकडो वाहनांच्या गराड्यात सापडणारा पुनावळे येथील भुयारी मार्ग कोंडीमुक्त व्हावा यासाठी वाहतूक विभाग प्रशासन वाहतूककोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबवीत आहे. येथील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका रेखा दर्शले आणि अश्विनी वाघमारे यांनी हिंजवडी वाहतूक विभागाशी संपर्क साधला. पुणे-मुंबई महामार्गावरील पुनावळे येथील भुयारी मार्गाची उंची मुख्य रस्त्यापेक्षा कमी झाल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. परिणामी, वाहनांना अडथळा निर्माण होत असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी नित्याची झाली होती.
पुनावळे येथील भुयारीमार्गातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येथे कायम स्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी हिंजवडी वाहतूक विभागाकडे करण्यात येत होती. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर पुनावळे येथे स्थानिक नागरिकांना जा-ये करण्यासाठी भुयारीमार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गाचा वापर महामार्गावरून मुंबई, कात्रज आदी ठिकाणी जाण्या-येण्यासाठी नागरिक करीत असतात. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. येथे विविध भागातून येणारे सहा रस्ते एकत्रित झाल्याने येथील कोंडी हा नित्याचाच भाग झाला होता. येथील वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलीस विभागाला वारंवार निवेदन देण्यात आले होते. परंतु तरीही उपाययोजनाकरण्याबाबत उदासीनता होती.
भुयारी मार्गातील गर्दीतून पुढे जाण्याच्या घाईत बेशिस्त वाहनचालकांकडून सर्व नियम धाब्यावर बसविले जातात. अशा काही चारचाकी वाहनांमुळे इतर वाहनांचाही खोळंबा होतो. त्यात भरीस भर म्हणून दुचाकीचालकही पुढे जाण्याच्या स्पर्धेत भाग घेतात. दुचाकीसह हलकी आणि अवजड वाहनेही या भुयारी मार्गातून जातात. वाहनांच्या संख्येने रस्ता अरुंद आणि या भुयारी मार्गाच्या पुलाची उंची कमी असल्याने वाहने त्यात अडकतात. त्यामुळे वाहतूककोेंडी होते.
वाहतूक नियमनासाठी युवकांचा पुढाकार
पुनावळेच्या भुयारी मार्गात सातत्याने वाहतूककोंडी होत असल्याने काही स्थानिक युवकांनी त्यावर तात्पुरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काही युवकांनी येथे वाहतूक नियमनासाठी पुढाकार घेतला. सागर शिंदे, रामदास सावंत, सागर बोरगे आणि इतर स्थानिक तरुणांसह अन्य काही जणांनी कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाच्या कर्मचाºयांविना सातत्याने वाहतूक नियमन सुरू ठेवले आहे.
उपरोधिक नावासह खिल्ली
देहूरोडकडून कात्रजकडे जाताना वाहनचालकांना फारशी अडचण येत नाही. परंतु महामार्गाच्या पुलाखालून पुनावळे तसेच माळवाडीकडे जाणाºया वाहनांना आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून जावे लागत होते. वाहतूककोंडीमुळे वाहतूक कोंडीचा मार्ग असे नवीन उपरोधिक नाव त्याला देण्यात आले. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट व्हायरलही झाल्या. काही जणांकडून प्रशासनाची खिल्लीही उडविण्यात आली.