पोलीस आयुक्तांची स्मार्ट सिटीवर नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 02:20 AM2019-02-02T02:20:57+5:302019-02-02T02:21:11+5:30
पुणेऐवजी पिंपरी आयुक्तांवर जबाबदारी
पिंपरी : पिंपरी-चिंचवडस्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून पुणे पोलीस आयुक्तांऐवजी आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने ह्यस्मार्ट सिटीह्ण प्रकल्प हाती घेतला आहे. देशातील १०० शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील दहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पुण्यासह पिंपरी - चिंचवड शहराचाही समावेश आहे. ही योजना राबविण्याकरिता पिंपरी महापालिकेकडून १३ जुलै २०१७ रोजी पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वहन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्या वेळी पिंपरी - चिंचवड शहर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित असल्याने पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या १० एप्रिल २०१८ रोजी झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मान्यता देण्यात आली.
नगरविकास विभागाचा आदेश
१५ आॅगस्ट २०१८ रोजी पुणे पोलीस आयुक्तालयातून विभाजन होऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार सुरू झाला आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून पुणे पोलीस आयुक्तांऐवजी आता पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा बदल तातडीने करावा, असा आदेश नगरविकास विभागाने जारी केला आहे.