सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस कॉन्स्टेबलला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 06:48 AM2017-09-30T06:48:36+5:302017-09-30T06:48:45+5:30
सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना खडकी सहायक पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.
पिंपरी : सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना खडकी सहायक पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.
दत्तात्रय किरू कोहक असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे. यातील तक्रारदार हे पूर्वी गुटखा विक्री करीत होते. मात्र, आता त्यांनी गुटखा विक्रीचा व्यवसाय बंद केला असून, सध्या त्यांच्याकडे वेफर्सची एजन्सी आहे. मात्र, त्यांचा अद्यापही गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे सांगत कोहक यांनी हप्ता म्हणून तक्रारदाराकडे सात हजार रुपये मागणीचा तगादा लावला होता. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
दरम्यान, शुक्रवारी खडकी सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात सापळा रचण्यात आला. सात हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यावर अंधाराचा फायदा घेऊन पळून जात असताना कोहक यांना पाठलाग करून पकडण्यात आले.