तपासणीसाठी मोटार थांबवल्याच्या रागातून पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 07:29 PM2020-05-11T19:29:39+5:302020-05-11T19:30:51+5:30
पोलीस व्हॅनचीही काच फोडली
पिंपरी : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात पोलिसांना मारहाण होण्याचे प्रकार सुरूच आहेत. चेक पोस्टवर पोलिसांनी मोटार थांबवून चौकशी करत असताना चालकाने दिघी पोलीस ठाण्यातील हवालदारासह शिपायाला मारहाण केली. एवढेच नाही तर आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड केली. हा प्रकार रविवारी सायंकाळी सव्वापाच वाजता बोपखेल फाटा, गणेशनगर येथे घडला.
दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,महेंद्र रवींद्र वाघमारे (वय ४५, रा. रामनगर, बोपखेल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार संजय व्यंकटेश कामठे यांनी फिर्याद दिली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी - चिंचवड पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार केले आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्व प्रकारे खबरदारी घेत आहे. पोलीस हवालदार कामठे हे बोपखेल फाटा नाक्यावर रविवारी कार्यरत होते. रस्त्याने जाणाऱ्या सर्व वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात होती. आरोपी महेंद्र त्याच्या मोटारीतून जात असताना कामठे यांनी त्यांची मोटार तपासणीसाठी थांबवली. मात्र, मोटार थांबवल्याचा राग आल्याने महेंद्र याने कामठे यांच्या कानाखाली वाजविली. पोलीस शिपाई जाधव यांना दगड फेकून मारला. तसेच पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. पोलीसांना मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल आरोपी महेंद्र याला पोलिसांच्या व्हॅनमधून दिघी पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना महेंद्र याने व्हॅनच्या खिडकीच्या काचेवर डोक्याने धडक मारून काच फोडली आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. महेंद्र याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, सरकारी मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.