ऑक्सिजन संपत आल्याने खासगी रुग्णालयांना पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 11:45 PM2021-04-20T23:45:27+5:302021-04-20T23:45:40+5:30
शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची गरज असलेले सुमारे बाराशेवर रुग्ण उपचार घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आल्याने पिंपरी -चिंचवड शहरातील परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे अडचणीचे झाले असून रुग्णांच्या नातेवाईकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची गरज असलेले सुमारे बाराशेवर रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र या रुग्णालयांकडील ऑक्सीजनचा साठा मंगळवारी (दि. २०) रात्रीनंतर केव्हाही संपू शकतो. ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी खासगी रुग्णालयांनी प्रयत्न केले. मात्र ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच नवीन रुग्ण दाखल करून घेण्यातही अडचणी येत आहेत.
महापालिका रुग्णालय, जम्बो कोविड सेंटर व ऑटॉक्लस्टर येथील कोविड सेंटर येथेही बॅड शिल्लक नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील रुग्णांना कुठे हलवावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रुग्णांच्या नातेवाइकांनी रोष व्यक्त केल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून खासगी रुग्णालयांकडून पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे.
ऑक्सिजनचा साठा संपत आला असून तो उपलब्ध होण्याबाबत 'एफडीए' अधिकाऱ्यांना विनंती केली. मात्र अद्याप ऑक्सिजन उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे नवीन रुग्ण दाखल करुन घेता येत नाहीत. आहेत या रुग्णांना ऑक्सीजन कोठून आणावा, असा प्रश्न आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
- डॉ. प्रमोद कुबडे, सचिव, पिंपरी -चिंचवड हॉस्पिटल ओनर असोसिएशन
मंगळवारी दुपारपासून सर्व हॉस्पिटलला भेटी देऊन पोलीस माहिती येत आहेत. रात्र पाळीतील अधिकाऱ्यांनाही भेटीबाबत सूचना दिल्या आहेत. आवश्यक तेथे पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येईल. परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.
- रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी -चिंचवड