पिंपरी-चिंचवड पोलिसांची दारूच्या अवैध विक्रीवर कारवाई; दारूसह इतर साहित्य जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 07:15 PM2022-06-03T19:15:30+5:302022-06-03T19:20:01+5:30
अवैध दारू विक्रीप्रकरणी कारवाई...
पिंपरी : ठिकठिकाणी छापा मारून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध दारू विक्रीप्रकरणी कारवाई केली. यात एका महिलेसह तिघांच्या विरोधात गुन्हे दाखल केला. तसेच दारू व इतर साहित्य जप्त केले.
गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने बुधवारी (दि. १) दुपारी पावणेबाराच्या सुमारास नागसेन झोपडपट्टी, बिजलीनगर, चिंचवड येथे छापा टाकला. यात एक महिला तिच्या घराशेजारील मोकळ्या जागेत बेकायदा दारू विक्रीसाठी बाळगताना मिळून आली. तिच्याकडे गावठी हातभट्टीची ३२ लिटर दारू व ३०० रुपये रोख, असा तीन हजार ५०० रपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. महिलेच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या कारवाईत राजू नरसप्पा भंडारी (वय २७, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी एमआयडीसी) याच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि. १) सायंकाळी सातच्या सुमारास महात्मा फुलेगर, भोसरी एमआयडीसी येथे कारवाई केली. त्यावेळी राजू भंडारी याच्याकडे एका पोत्यामध्ये ताडी भरलेले प्लास्टिकचे ५० फुगे मिळून आले. प्रत्येकी एक लिटरचा एक फुगा, अशी एकूण ५० लिटर ताडी बेकायदेशीरपणे विक्रीसाठी बाळगताना राजू भंडारी मिळून आला.
तिसऱ्या कारवाईत अजय विलास सावंत (वय १९, रा. थेरगाव) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने बुधवारी (दि. १) रात्री आठच्या सुमारास हुलावळे वस्ती, हिंजवडी येथे कारवाई केली. अजय सावंत हा तीन हजार १८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या विनापरवाना विक्रीसाठी बाळगत असताना मिळून आला.