कोथुर्णेमध्ये 'दुर्गा’ अवतरल्याने नराधमाचे पाप उघडकीस

By नारायण बडगुजर | Published: August 10, 2022 09:08 AM2022-08-10T09:08:52+5:302022-08-10T09:14:57+5:30

सॅंडलवरून काढला माग...

police dog squad Durga helped in kothurne incident investigation sin of murder is exposed | कोथुर्णेमध्ये 'दुर्गा’ अवतरल्याने नराधमाचे पाप उघडकीस

कोथुर्णेमध्ये 'दुर्गा’ अवतरल्याने नराधमाचे पाप उघडकीस

googlenewsNext

पिंपरी : मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या. या तपासात ‘डाॅग स्काॅड’मधील दुर्गा या श्वानाने महत्त्वपूर्ण भूमिका  बजावली. त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना मोठी मदत झाली.

कोथुर्णे येथे सात वर्षीय मुलीचे २ जुलै रोजी अपहरण करून लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. तिचा मृतदेह ३ जुलै रोजी अल्पवयीन मुलीचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पुणे येथून डाॅग स्क्वाॅडला पाचारण करण्यात आले. या पथकातील दुर्गा या श्वानाने मृतदेह आढळलेल्या ठिकाणापासून आरोपीचा माग काढण्यास सुरवात केली. त्यामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यास मदत झाली. दीड ते दोन तासात आरोपी निष्पन्न झाला. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

सॅंडलवरून काढला माग

डाॅग स्क्वाॅड गावात दाखल झाल्यानंतर गावकऱ्यांची गर्दी झाली होती. दुर्गा या ‘फीमेल’ श्वानाला पीडित मयत मुलीच्या सॅंडलचा वास देण्यात आला. त्यामुळे मुलगी खेळत असलेल्या तसेच ती गेलेल्या इतर ठिकाणी ‘दुर्गा’ श्वान गेले. त्यानंतर आरोपीच्या घरात ‘दुर्गा’ गेली. तेथून पोलिसांना या प्रकरणाचा उलगडा झाला, असे काही गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

चार तासांत आरोपीला बेड्या

पीडित मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर श्वान पथकाने माग काढला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मृतदेह मिळाल्यानंतर अवघ्या चार तासांत आरोपी निष्पन्न होऊन त्याला पोलिसांनी बेड्या ठोल्या.

आरोपी स्थानिक असल्याचा पोलिसांचा अंदाज ठरला अचूक

कामशेत पोलीस ठाण्याचे तसेच पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक कोथुर्णे येथे अल्पवयीन मुलीचा शोध घेत होते. त्यासाठी गावकऱ्यांसह १० जणांचा एक गट असे विविध गट तयार करून शोध सुरू केला. त्यावेळी मुलीचा मृतदेह मिळून आला. त्यावरून आरोपी स्थानिक असेल, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. त्यामुळे लागलीच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. आरोपी हा १८ ते २५ वयोगटातील तसेच तो स्थानिक असावा, असा अंदाज व्यक्त करून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांचा अंदाज अचूक ठरला.

सात वर्षीय ‘दुर्गा’मुळे गंभीर गुन्ह्यांची उकल

दुर्गा हे श्वान २०१६ मध्ये पोलीस दलात दाखल झाले. नऊ महिन्यांचे प्रशिक्षणही झाले आहे. अशोक लोखंडे आणि सागर रोकडे हे दुर्गाचे हॅंडलर आहेत. शिक्रापूर येथून कोविड सेंटरमधून पळून गेलेल्या आरोपीचा माग दुर्गाने घेतला होता. तसेच पौड येथील खून प्रकरण आणि मंचर येथील चोरीच्या गुन्ह्याची उकल होण्यास दुर्गामुळे मदत झाली होती. त्यानंतर काेथुर्णे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातही दुर्गाची भूमिका महत्त्वाची ठरली. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या हस्ते दुर्गाचा गौरव करण्यात आला.  

‘दुर्गा’ने सार्थ ठरविला विश्वास

गुन्हा घडल्यानंतर तपासाची चक्रे फिरविली जातात. मात्र, आधी श्वान पथकाला पाचारण करा, असा आग्रह पोलीस तसेच सामान्यांकडूनही धरला जातो. हा आग्रह म्हणजेच श्वान पथकावर असलेला विश्वास होय. हा विश्वास ‘दुर्गा’ हे श्वान सार्थ ठरवित आहे, असे हॅंडलर सागर रोकडे यांनी सांगितले.

लपवलेला कापड शोधून काढणे, चपलेच्या वासावसून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यात ‘दुर्गा’ हे श्वान तरबेज आहे. पहाटे पाचपासून दुर्गाची दिनचर्या सुरू होते. सकाळी आणि सायंकाळी आहार दिला जातो. पहाटे आणि सायंकाळी सराव होतो. तसेच इतर वेळी ‘दुर्गा’ विविध खेळांमध्ये रमत असते. तिच्याकडून विविध गुन्ह्यांची उकल होण्यात मोठी मदत झाली आहे. कोथुर्णे येथील घटनेतही दुर्गाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

- सागर रोकडे, हॅंडलर, डाॅग स्काॅड

Web Title: police dog squad Durga helped in kothurne incident investigation sin of murder is exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.