पोलिसांनी दिला रोडरोमिओंना काठीचा प्रसाद
By Admin | Published: September 1, 2015 04:02 AM2015-09-01T04:02:56+5:302015-09-01T04:02:56+5:30
रोडरोमिओंची माहिती त्वरित पोलिसांना कळवा, त्वरित कारवाई करण्यात येईल, असा इशारा खडकी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी दिला
सर्वजीत बागनाईक, खडकी
रोडरोमिओंची माहिती त्वरित पोलिसांना कळवा, त्वरित कारवाई करण्यात येईल, असा इशारा खडकी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी दिला. महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या रोडरोमिओंना त्यांनी काठीचा ‘प्रसाद’ देऊन कडक समज दिली.
पोलिसांनी हद्दीतील महाविद्यालयातील प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यामध्ये त्यांनी यासह विविध सूचना मांडल्या. कॉलेजमधील तरुणींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी पोलीस विविध योजना आखत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. कॉलेज सुरू झाल्यावर तरुणींना रोडरोमिओ किंवा टिंगलटवाळी करणाऱ्या तरुणांकडून त्रास देण्याचे प्रकार घडतात, ते होऊ नयेत, याबाबत दक्षता घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. सुमारे दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाली. तरुणींची कोठेही छेडछाड झाली, तरी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. कॉलेज परिसरात कॉलेजशी संबंध नसलेले तरुण येणार नाहीत, याची काळजी घ्यावी; तसेच पोलीस ओळखपत्र तपासण्याची मोहीम राबवतील.