पोलिसांच्या सहकार्याने ' त्या' हवालदिल कुटुंबाचा काही दिवसांसाठी अन्न पाण्याचा प्रश्न मिटला ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 02:37 PM2020-04-20T14:37:48+5:302020-04-20T14:38:52+5:30

बँकेत पैसे नाही, हाताला काम नाही, घर‍ात खायला काही नाही, साहब अब मै बच्चे को दूध कैसे पिलाऊ..

police give food kit to family who suffered bad condition due to corona | पोलिसांच्या सहकार्याने ' त्या' हवालदिल कुटुंबाचा काही दिवसांसाठी अन्न पाण्याचा प्रश्न मिटला ! 

पोलिसांच्या सहकार्याने ' त्या' हवालदिल कुटुंबाचा काही दिवसांसाठी अन्न पाण्याचा प्रश्न मिटला ! 

googlenewsNext

लोणावळा: वेळ दुपारी चारची...बाहेर रखरखीत ऊन आणि निर्मनुष्य रस्ते, बंदोबस्तावरचे पोलीस एवढीच काय ती मानवजात रस्त्यावर उभी.. अशातच लोणावळा पोलीस ठाण्याच्या बाहेर एक तिशीतला तरुण त्याच्या कडेवरच्या साधारण 2 व 4 वर्षांच्या मुलांसह तिथे येऊन उभा राहिला. त्या तरुणाच्या पाठोपाठ त्याची पत्नीसुद्धा कडेवरच्या मुली सह तिथे आली. त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर भीती अन् डोळ्यात तीव्रतेची साठलेली भूक दिसत होती...दोघे पती पत्नी हवालदिल अवस्थेत.. अचानक तो तरुण अचानक धाय मोकलून रडू लागला व काही विचारायच्या आतच 'साहेब अब मै क्या करू? ' असे म्हणून हातातलं बँकेच पुस्तक दाखवू लागला. त्याची ही अवस्था पाहून पोलिसांनी त्याच्याजवळ जात रडतोस का अशी विचारणा करत आधाराचे दोन शब्द बोलत त्यांचे दुःख समजून घेतलं.तसेच त्या कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल एवढं धान्याचं कीट मिळवून दिलं.. 

लोणावळा पोलीस ठाण्याच्या परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या कुटुंबाला धीर देऊन अरे, बाबा रडू नकोस काय झालं ते तरी सांग असं विचारलं.. तेंव्हा त्याने स्वतःचे, पत्नीचे व मुलांची नावे सांगितली. तो तरुण मूळचा बिहारचा असून गेली सहा वर्ष लोणावळ्यात मिळेल ते बिगारी काम करून कैलास नगर झोपडपट्टीमध्ये राहत होता. मुलीला दूध आणायचं म्हणून तो पैसे काढायला बँकेत गेला तर खात्यात जेमतेम असलेले सहा हजार रुपये ऑनलाइन कट झाल्याचे समजले. बँकेत पैसे नाही, हाताला काम नाही, घर‍ात खायला काही नाही, साहेब अब मै बच्चे को कैसे दूध पिलाऊ...कहा से पैसे लावू...कामधंदा बंद हो गया... कोई पैसे नही देगा... असे आर्त स्वरात त्याने त्याची व्यथा मांडली. त्या कुटुंबाची ही व्यथा ऐकून ठाणे अंमलदार सामील प्रकाश, अमोल कसबेकर, सुनील देशमुख यांनी घरात खायला काय आहे असे विचारलं असता त्याच्या पत्नीने दोन दिवस पुरेल एवढं राशन आहे असं खरं उत्तर दिलं.  त्यावेळी त्या कुटुंबाने 'साहब ये बिमारी कब जयेंगी... काम कब चालू होंगे... यांसारख्या प्रश्नांची सरबत्तीच केली.  तिचे प्रश्न ऐकून पोलिसांनी जल्दी जायेगी ये बिमारी... और काम भी चालू होंगे... लेकिन आप बाहर मत निकलो असे त्यांना सांगितले.  

त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक मनोज यादव यांना फोन करून त्या कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती दिली. यादव यांनी शिवाजी मित्र मंडळाचे चेतन प्रकाश चव्हाण यांना फोन करून सर्व माहिती कळवताच चव्हाण यांनी पंधरा दिवस पुरेल एवढं धान्याचं किट पोलीस स्टेशनला पाठवून दिलं. कोरोना महामारीला हद्दपार करण्यासाठी प्रत्येकाने घरात थांबून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Web Title: police give food kit to family who suffered bad condition due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.