Pune crime: अहमदाबादचा पोलीस आयुक्त बोलतोय म्हणत घातला पोलिसांनाच गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 02:59 PM2021-12-30T14:59:21+5:302021-12-30T15:01:08+5:30
आरोपीने ८ ते २८ डिसेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पोलीस नियंत्रण कक्षात पोलिसांना वारंवार फोन केला...
पिंपरी : मी अहमदाबाद पोलीस आयुक्त विजयिसंग साहेब बोलतोय, असे सांगून पैसे उकळणाऱ्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खबऱ्या असल्याची बतावणी करून त्याने वारंवार पोलिसांकडून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कामगिरी केली. खलीउल्लाहा अयानुल्लाह खान (वय ४२, रा. जोगेश्वरी, मुंबई), असे अटक केलेल्या तोतयाचे नाव आहे. त्याला शुक्रवारपर्यंत (दि. ३१) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ८ ते २८ डिसेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पोलीस नियंत्रण कक्षात पोलिसांना वारंवार फोन केला. मी अहमदाबाद पोलीस आयुक्त विजयसिंग साहेब बोलतोय, आपल्या पोलीस आयुक्तांचा फोन नंबर द्या, असा कॉल आरोपीने केला. त्यानुसार पोलीस आयुक्तांचा फोन नंबर देण्यात आला. त्यानंतर आरोपीने पुन्हा कॉल केला. तुमचे पोलीस आयुक्त यांना मी वारंवार फोन करतो, परंतू ते माझा फोन उचलत नाहीत. पिपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैधपणे मोठ्या प्रमाणात पिस्तूलची डिल करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी माहिती द्यायची आहे. तुमच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे फोन नंबर मला द्या, असे आरोपीने सांगितले.
त्यानुसार त्याला अधिकाऱ्यांचे नंबर देण्यात आले. त्यानंतर पुन्हा आरोपीने फोन केला. मी पोलीस आयुक्तांना २५ वेळा फोन केला. परंतू ते फोन उचलत नाहीत, असे आरोपी म्हणाला. मी गुप्त खबऱ्या बोलतोय, तुमच्या हद्दीमध्ये पिस्तूलची अवैध विक्री होणार आहे, असे सांगून त्याने पोलीस उपनिरीक्षकाच्या व्हॉट्सअपवर पिस्तूल विक्री करणाऱ्या इसमांचे फोटो, गाडीचा फोटो व पिस्तूलचे खोटे फोटो पाठविले. तसेच पैशांची मागणी केली.
आरोपीबाबत संशय आल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. आरोपी हा गोरेगांव, मुंबई येथे असल्याचे समोर आल्याने पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. त्यानंतर आरोपीचा विश्वास संपादन करण्यासाठी २४ हजार रुपये त्याच्या पेटीएम व गुगलपेवर पाठविले. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याने यापूर्वी बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून अशाच प्रकारे आर्थिक फसवणूक केली असल्याचे चौकशीत समोर आले. त्याच्या विरुद्ध मुंबई येथील मालाड, गोरेगाव, ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत.
आरोपी हा ऑनलाईन पध्दतीने पोलीस नियंत्रण कक्षाचे फोन नंबर प्राप्त करायचा आणि पोलीस नियंत्रण कक्षाकडून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर प्राप्त करून त्यांच्याशी संपर्क साधायचा. माझ्याकडे पिस्तूलचे काम आहे, अशी बतावणी करायचा. त्यानंतर पैशांची मागणी करून पोलिसांची ऑनलाईन पध्दतीने फसवणूक करायचा. पोलिसांचा गुप्त खबऱ्या असल्याची बतावणी करून सन २०१५ पासून आर्थिक फसवणूक करीत असल्याचे आरोपीने कबुल केले आहे.
पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सागर पानमंद, प्रदिपसिंग सिसोदे, उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र घनवट, विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, अतुल लोखंडे, योगेश तिडके, नितेश बिच्चेवार, नागेश माळी, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, राजेश कोकाटे, सोनाली माने, अमोल साडेकर, सुमित डमाळ, अमोल शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.