पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांची कुंडली काढली, शहरातून १३९ जण तडीपार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 12:15 PM2023-12-07T12:15:30+5:302023-12-07T12:26:34+5:30
यंदा पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी १३९ सराईत गुन्हेगारांना तडीपारीचा तडाखा दिला...
- नारायण बडगुजर
पिंपरी : गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी कंबर कसलेल्या पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासाठी मोक्का, स्थानबद्धतेसह तडीपारीची कारवाई केली जात आहे. यंदा पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी १३९ सराईत गुन्हेगारांना तडीपारीचा तडाखा दिला.
दहशत माजवणाऱ्या तसेच खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमधील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना पोलिस आयुक्त चौबे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेची विविध पथके गुन्हेगारांच्या मागावर आहेत. यात सराईतांची ‘कुंडली’ काढून त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
कोम्बिंग ऑपरेशन
पोलिस आयुक्तालयांतर्गत सातत्याने ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सुरू आहे. त्यामुळे विविध गुन्ह्यांतील ‘वॉन्टेड’ संशयित तसेच सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई होत आहे. तडीपार केलेले गुन्हेगार तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच परवानगी न घेता शहरात वावरत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावरही पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होत आहे.
तडीपारी रद्द करण्यासाठी खटाटोप
काही गुन्हेगार तडीपारीची कारवाई रद्द करण्यासाठी खटपट करतात. यात काही जणांवरील कारवाई रद्द होते. यंदा चार महिलांवर कारवाई केली होती. त्यांनी या कारवाईला आव्हान देत तडीपारी रद्द करून आणली.
पोलिसांना धक्काबुक्की
तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून काही गुन्हेगार विनापरवानगी शहरात येतात. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्यांच्याकडून धक्काबुक्की करून मारहाण केली जाते.
सराईतांना ‘सळो की पळो’ करून सोडले
पोलिसांनी ‘मोक्का’सह तडीपारीचा तडाखा दिल्याने शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस आयुक्त चौबे यांच्याकडून सतत विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. त्यांनी गुन्हेगारांना ‘सळो की पळो’ करून सोडले आहे.
शस्त्र बाळगले तर याद राखा!
पिस्तूल, कोयता, तलवार यासारखी घातक शस्त्रे बेकायदेशीरपणे बाळगून दहशत पसरविण्याचा प्रकार काही जणांकडून केला जातो. अशाप्रकारे शस्त्र बाळगणारे सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यासाठी ‘आर्म ड्राइव्ह’ घेण्यात येत आहे. यात सातत्याने मोठी कारवाई करून पिस्तूल, कोयता, तलवार जप्त केले जात आहेत.
नातेवाइकांवर ‘वाॅच’
तडीपार केलेल्यांची पोलिस आयुक्तालय हद्दीबाहेर किंवा जिल्ह्याबाहेर रवानगी केली जाते. अशा तडीपारांना त्यांच्या नातेवाइकांकडे सोडून त्याबाबत सातत्याने माहिती घेतली जाते. गुन्हेगारांच्या राहत्या घरी सातत्याने भेट देऊन पोलिस पाहणी करतात. त्यासाठी त्यांच्या नातेवाइकांशी सातत्याने संपर्क साधला जातो. त्यांच्याकडे विचारणा केली जाते.
सराईत गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई होत आहे. संघटित गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणाचीही हयगय केली जाणार नाही.
- विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड