खाकीतला देवमाणूस ! उपासमारीची वेळ आलेल्या कामगारांना केले धान्याचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:44 PM2020-03-27T12:44:30+5:302020-03-27T12:46:36+5:30
हातावर पाेट असणाऱ्या कामगारांचे लाॅकडाऊनच्या काळात हाल हाेत असल्याने रावेत येथील पाेलिसांनी या नागरिकांना धान्याचे वाटप केले.
रावेत : खाकी वर्दीतील पोलीस म्हणले की भल्या भल्यांच्या मनात भिती निर्माण होते.परंतु पोलिसांमध्येही माणुसकीचा धर्म असतो याची प्रचिती रावेत भागात पहायला मिळाली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन करण्यात आले आहे. केवळ जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीच नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. विनाकारण घराबाहेर पडणा-या नागरिकांना पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद देण्यात येत आहे. लॉक डाऊनच्या परस्थितीमुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
देहूरोड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या रावेत पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी आपले सहकारी पोलीस निरीक्षक अर्जुन पवार आणि सर्व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने रावेत परिसरात विविध ठिकाणी असणाऱ्या लेबर कॅम्प वसाहतीत जाऊन येथील कुटुंबाला एक आठवड्याचे जीवनावश्यक वस्तू दिल्या. तांदूळ, पीठ, साखर, चहापावडर, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. रावेत पोलीस चौकीजवळील लेबर कॅम्प, म्हस्केवस्ती कडील लेबर कॅम्प वसाहतीतील ८० कुटुंबांना राजमाने आणि पवार यांनी किराणा साहित्य दिले. त्यामुळे लेबर कॅम्प वसाहतीतील कुटुंबाना दिलासा मिळाला आहे.या निमित्ताने कोरोना विषाणूच्या संकटात पोलिसांतील माणसाचे व माणुसकीचे दर्शन घडले.
पोलीस कर्मचारी बाळासाहेब गवारे, ढवळा चौधरी,आकाश जाधव, नवीन चव्हाण, उमेश भंडारी,राहुल लबडे, विनायक शिंदे आदीनी रावेत परिसरातील विविध ठिकाणच्या लेबर कॅम्प मधील कुटुंबाना साहित्य वाटप केले.
हातावर पोट असणंऱ्या कुटुंबाची सध्य परिस्थितीत ससेहोलपट होत आहे. हाताला काम नाही म्हणून जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पैसे उपलब्ध नाहीत ही बाब आमच्या लक्षात आल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना मदतीचे आवाहन केले.लागलीच सर्व कर्मचाऱ्यांनी यासाठी आपले योगदान दिले.कोणीही उपाशी राहू नये म्हणून हा प्रयत्न केला जात आहे.
- राजेंद्र राजमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,रावेत पोलीस चौकी