अजगर चोरीची चौकशी, महापालिकेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 06:49 AM2017-08-29T06:49:46+5:302017-08-29T06:50:36+5:30
चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातून दोन अजगरांची चोरीच्या घटनेस आठवड्याचा कालावधी उलटला तरी तपासात फारशी प्रगती झालेली नाही.
पिंपरी : चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातून दोन अजगरांची चोरीच्या घटनेस आठवड्याचा कालावधी उलटला तरी तपासात फारशी प्रगती झालेली नाही. तीन दिवसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्पमित्रांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. ही चोरी सर्प हाताळण्याची माहिती असणाºयांनीच केली असावी, असा अंदाज महापालिका अधिकाºयांनी व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांच्या रडारवर सर्पमित्र असणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संभाजीनगरात सर्पोद्यानाची निर्मिती केली आहे. मागील आठवड्यात दोन अजगरांच्या चोरीचे प्रकरण उघडकीस आले आहे. भारतीय जातीचे दोन अजगर असून, त्यातील एक अजगर साडेसात फूट आणि दुसरा साडेपाच फूट लांबीचा होता. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील प्राणिसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही घटना घडल्यानंतर आयुक्तांनी सुरक्षेविषयी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच तक्रार दाखल करण्यास वेळ का लागला? याची चौकशी केली जाणार आहे. सीसीटीव्ही बसवावेत, तसेच सुरक्षारक्षक वाढवावेत, रात्रीची गस्त वाढवावी अशा सूचना केल्या. चोरी झाली त्या वेळी कामावर असणाºया दोन सुरक्षारक्षकांची बदली केली असून, त्याजागी दुसरे सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत.
पिंपरी-चिंचवड परिसरात पन्नास सर्पमित्र आहेत. सर्पमित्रांची नावे आणि संपर्क क्रमांक महापालिका प्रशासनाने पोलिसांना दिला आहे. तसेच चोरीच्या कालखंडात सर्पमित्र कोठे होते, याचीही कसून चौकशी केली जाणार आहे़ त्यामुळे अजगर चोर लवकरच पोलिसांच्या जाळ्यात सापडतील, असा अंदाज आहे.
अजगर चोरी झाली त्या वेळी ‘अजगर चोरीत सर्पमित्रांचाच हात’ असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या शक्यतेस आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही दुजोरा दिला होता. ज्या व्यक्तीला साप कसे पकडतात किंवा कसे हाताळतात, याची माहिती असणारी व्यक्तीच ही चोरी करू शकते, असा अंदाज प्राणिप्रेमींनी व्यक्त केला आहे. एखादा सर्पमित्रच यात सहभागी असावा, असा प्राथमिक अंदाज पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केला होता. दरम्यान या दिशेने पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे.