पोलिसांचा धाक नसल्याने आरोपी सैराट?
By Admin | Published: April 26, 2017 03:49 AM2017-04-26T03:49:50+5:302017-04-26T03:49:50+5:30
मावळमध्ये दिवसेंदिवस खून, चोऱ्या, अवैध धंदे वाढत चालले असून, पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.
वडगाव मावळ : मावळमध्ये दिवसेंदिवस खून, चोऱ्या, अवैध धंदे वाढत चालले असून, पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. वाढत चाललेली गुन्हेगारी चिंतेची बाब असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसांपासून तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, पोलीस मात्र काही घडतच नाही असा दिखावा करत आहेत़ गेल्या तीन दिवसांत तालुक्यात ५ खून झाले असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांना संशय येऊ लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात चोर असल्याच्या अफवा येत होत्या. त्यासाठी गावागावांत नागरिक रात्रभर गस्त घालत असत. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी घरावर दगड पडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. याबाबत नागरिकांनी पोलिसांनादेखील वेळोवेळी कळवले होते; परंतु या सर्व अफवा आहेत, यावर विश्वास ठेवू नका, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. परंतु, धामणे गावात दरोडेखोरांच्या हल्ल्यात तिघांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर तालुक्यात चोर आहेत असा नागरिकांचा ठाम विश्वास झाला व चोर असल्याच्या अफवा सांगणाऱ्या पोलिसांवरचा नागरिकांचा विश्वास कमी होऊ लागला आहे. तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस कोठेही गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. तळेगावचे माजी नगराध्यक्षाचा भर दिवसा खून, तळेगावातील महाविद्यालयातील विद्यार्ध्याचा खून, लोणावळ्यातील युवक युवतीचा खून, सांगवडे येथील सरपंचाच्या पतीचा खून, या घटना ताज्या असताना धामणे गावात दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकाच घरातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर काही वेळातच लोणावळा येथील कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या सर्व घडामोडीवरून हे स्पष्ट होतंय की तालुक्यात पोलिसांची कोणताही वचक राहिली नसून, गुन्हेगाराला पोलिसांची भीतीच राहिली नाही.
मावळात खून, दरोडे अशा काही घटना घडल्या की पोलीस तालुक्यातील पोलीस ठाण्यात नागरिकांची बैठक बोलावतात आणि त्यांनाच मार्गदर्शन करतात. (वार्ताहर )