नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलिसांची मेहेरनजर
By admin | Published: August 28, 2016 04:17 AM2016-08-28T04:17:24+5:302016-08-28T04:17:24+5:30
विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नावाचे बॅनर लावून दहीहंडी फोडली. २० फुटांपेक्षा अधिक उंचीवर दहीहंडी नसावी, असे न्यायालयाचे आदेश असताना, पिंपरी-चिंचवडमध्ये
पिंपरी : विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नावाचे बॅनर लावून दहीहंडी फोडली. २० फुटांपेक्षा अधिक उंचीवर दहीहंडी नसावी, असे न्यायालयाचे आदेश असताना, पिंपरी-चिंचवडमध्ये बहुतांशी ठिकाणी पाच ते सहा थर रचून दहीहंडी फोडल्याचे दिसून आले. नियमांचे पालन करणाऱ्या काही मंडळांचा अपवाद वगळता नियमांचे उल्लंघन करून दहीहंडी फोडणाऱ्या अनेक मंडळांपैकी एकाही मंडळांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. पुणे शहर व परिसरात मात्र २५ मंडळांवर गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे. महापालिका निवडणूक जवळ आल्याने यंदाच्या दहीहंडी उत्सवात राजकीय रंग असल्याने उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलिसांची मेहेरनजर असल्याचे जाणवले.
दहीहंडी उत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये दोन डझनहून अधिक सिनेतारकांनी हजेरी लावली. दहीहंडीचा जल्लोष रात्री असला, तरी दुपारपासूनच पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत गटागटाने थांबलेले बाऊन्सर नागरिकांना दृष्टिपथास आले. दहीहंडी उत्सवाला सिनेतारका येणार असल्याने त्या त्या ठिकाणी बाऊन्सर तैनात करण्यात आले होते. दहीहंडी उत्सवानिमित्ताने गुरुवारी शहरात वेगळेच वातावरण होते. महापालिका निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांनी दहीहंडीच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनच केले. वजनदार राजकीय नेते आधारस्तंभ असलेल्या मंडळांनी जल्लोष केला. एका ठिकाणी पाच ते सहा सिनेतारकांना निमंत्रित करून गोपाळ पथकांवर लाखो रुपये खर्च केला. दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईहून आलेल्या गोपाळ पथकांनी उंच असे सात थर रचून दहीहंडी फोडली.
- न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन करून वीस फुटांपेक्षा जास्त उंचीचे थर रचणाऱ्या दहीहंडी उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल झाले नाहीत. शिवाय, ध्वनिप्रदूषण, रहदारीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने ज्या मंडळांनी मंडप उभारले होते, त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली नाही. पुण्यात मात्र ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर, तसेच रहदारीस अडथळा ठरेल, अशा पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनाही पुणे शहर पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवला आहे.