पोलीस कर्मचार्यानी दिली आई, बहिणीला गोळ्या घालण्याची धमकी; काळेवाडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:31 IST2024-12-31T13:29:38+5:302024-12-31T13:31:11+5:30
पोलिस कर्मचारी आणि त्यांची बहीण यांच्यात आई-वडिलांच्या मिळकतीवरून वाद सुरू आहे.

पोलीस कर्मचार्यानी दिली आई, बहिणीला गोळ्या घालण्याची धमकी; काळेवाडीतील घटना
पिंपरी : मिळकतीच्या वादातून पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:च्या आई व बहिणीला शिवीगाळ केली. त्या दोघींनाही गोळ्या घालण्याची धमकी दिली. मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल केला. काळेवाडी येथे शनिवारी (दि. २८) दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली.
काळेवाडी येथे राहणाऱ्या ५४ वर्षीय महिलेने याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी ५३ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेला पोलिस कर्मचारी हा फिर्यादी महिलेचा भाऊ आहे. पोलिस कर्मचारी आणि त्यांची बहीण यांच्यात आई-वडिलांच्या मिळकतीवरून वाद सुरू आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोलिस कर्मचारी पत्नी आणि मुलीसह फिर्यादी बहिणीच्या घरी आला. बहिणीसोबत आईदेखील होती. त्यावेळी भावाने आई आणि बहिणीला शिवीगाळ केली. पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी आणि मुलीनेही त्यांना शिवीगाळ केली. ‘मीपण पोलिस आहे, मी तिला गोळ्या घालतो, काय होईल ते होईल’, असे तो म्हणाला. त्यानंतर पत्नी आणि मुलीला तो म्हणाला की, तुम्ही दोघींनी बहीण आणि आईला मारहाण केली नाही तर मी फास लावून आत्महत्या करेन. फिर्यादी बहिणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे.