शहर दलातील कर्तृत्ववान पोलिसांचा होणार सन्मान; विविध पदक, प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 09:11 PM2023-01-25T21:11:11+5:302023-01-25T21:11:27+5:30
पोलीस उपायुक्तांच्या हस्ते ३८ पोलिसांना सन्मानित केले जाणार आहे.
पिंपरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना विविध पदक, प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयात हा सोहळा होणार आहे. पोलीस उपायुक्तांच्या हस्ते ३८ पोलिसांना सन्मानित केले जाणार आहे.
पोलीस आयुक्तालयातील सहा पोलिसांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. यात बिनतारी संदेश विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, खंडणी विरोधी पथकाचे सहायक फौजदार अशोक दुधवणे, चाकण पोलीस ठाण्याचे हवालदार राजू जाधव, तांत्रिक विश्लेषण विभागाचे हवालदार नागेश माळी, गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचारी स्मिता पाटील यांचा समावेश आहे. गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट सन्मानचिन्ह चार जणांना प्रदान करण्यात येईल. यात म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, मुख्यालयाचे उपनिरीक्षक विजय जगदाळे, आळंदी पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन मोरे, आळंदीचे पोलीस कर्मचारी राजकुमार हनमंते यांचा समावेश आहे.
विशेष सेवा पदक सात जणांना प्रदान करण्यात येणार आहे. यात पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, उपनिरीक्षक गंगाधर ढगे, नागनाथ सूर्यवंशी, अहमद मुल्ला, समीर दाभाडे, गुन्हे शाखा युनिट तीनचे कर्मचारी योगेश्वर कोळेकर, युनिट पाचचे कर्मचारी ज्ञानेश्वर गाडेकर यांना सन्मानित केले जाणार आहे.
पुणे येथे ७ ते १३ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा झाली. यात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक पटकावले. या कर्मचाऱ्यांना देखील यावेळी सन्मानित केले जाणार आहे. यात विशेष शाखेच्या पोलीस नाईक रश्मी धावडे, वाहतूक शाखेच्या परवीन पठाण, दिघी पोलीस ठाण्याच्या पुनम लांडे, चिंचवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमोल साळुंके, सांगवी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुहास डंगारे, देहूरोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोहसीन अत्तार, विशेष शाखेच्या कर्मचारी राजश्री रावत, सायबर सेलच्या कर्मचारी स्मिता पाटील, युनिट पाचचे पोलीस नाइक अली शेख, मुख्यालयातील पोलीस नाइक शरीफ मुलाणी, युगंधरा अवसरमल यांचा सन्मान होणार आहे.