पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांची छापेमारी; सहा ठिकाणी कारवाई, तीन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 05:47 PM2022-05-30T17:47:23+5:302022-05-30T17:54:15+5:30
पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली
पिंपरी : अवैध दारु विक्री प्रकरणी पिंपरी-चिंचवडपोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. चाकण, दिघी आणि पिंपरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक तर हिंजवडी पोलीस ठाण्यात तीन असे एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले. यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
चाकण पोलिसांनी नाणेकरवाडी गावाच्या हद्दीत रविवारी (दि. २९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कारवाई केली. यात श्रीकांत राजेंद्र कोळी (वय २५, रा. नाणेकरवाडी) याला अटक केली. आरोपीने दोन हजार ७०० रुपयांची देशी दारु विनापरवाना बाळगून चोरून विक्री करताना पोलिसांना मिळून आला.
दिघी पोलिसांनी आळंदी देवाची येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर रविवारी (दि. २९) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास कारवाई केली. राजकुमार छत्रपाल यादव (वय १९), व्यंकटेश माधवराव मठपती (वय २०, दोघेही रा. आळंदी देवाची) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. व्यंकटेश मठपती याच्या सांगण्यावरून राजकुमार यादव याने विक्रीसाठी चार हजार ३२० रुपये किमतीच्या देशी दारुच्या बाटल्या बाळगल्या. कारवाई करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पिंपरी पोलिसांनी रविवारी विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे कारवाई केली. उजनवती संपत सुरवसे (वय ४८, रा. विठ्ठलनगर) आणि सोन्या (वय २७, रा. भाटनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. उजनवती सुरवसे ही महिला ५२० रुपये किमतीची पाच लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना मिळून आली. आरोपी सोन्या याने विक्रीसाठी महिलेला दारू आणून दिली.
अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. २८) पुनावळे येथे कारवाई केली. विनापरवाना विक्रीसाठी दोन हजार १०० रुपयांची दारू बेकायदेशीरपणे त्याच्या ताब्यात बाळगल्याप्रकरणी सुधीर कमल मंडल (वय ३५, रा. पुनावळे) याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलिसांनी रविवारी हिंजवडी येथे कारवाई करून अजय लालूराम कर्मावत (वय २०, रा. हिंजवडी) याला अटक केली. त्याच्यासह समाधान महादेवराव दोडके (वय ३७, रा. म्हाळुंगेगाव, ता. मुळशी) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हिंजवडी पोलिसांनी दुसरी कारवाई माण येथे केली. संतोष परशुराम राठोड (वय ४३, रा. भोईरवाडी, ता. मुळशी) याला अटक करून त्याच्यासह भगवान भाऊसाहेब भोईर (वय ६८, रा. भोईरवाडी, ता. मुळशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.