पत्नीला एचआयव्हीची बाधा करणाऱ्या पतीचा अहवाल पोलिसांना मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 03:25 AM2018-12-11T03:25:33+5:302018-12-11T03:25:51+5:30
वाकड पोलिसांना ‘नारी’ संस्थेतून पतीचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. महिलेच्या अहवालाच्या प्रतीक्षेत पोलीस असून, त्यानंतरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
पिंपरी : भोसरीतील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत (नारी) वाकड येथील पती-पत्नींची एचआयव्हीची तपासणी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली असून, सोमवारी वाकड पोलिसांना ‘नारी’ संस्थेतून पतीचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. महिलेच्या अहवालाच्या प्रतीक्षेत पोलीस असून, त्यानंतरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
घटस्फोट घेण्यासाठी पत्नीच्या शरीरात डॉक्टर पतीने एचआयव्हीचे विषाणू सोडल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली. फिर्यादी महिलेसह आरोपीला एचआयव्ही चाचणीसाठी पोलिसांनी भोसरीतील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत (नारी) पाठविले होते. त्यांचा एचआयव्ही चाचणी अहवाल पोलिसांना शुक्रवारी प्राप्त होणार होता. मात्र, हा अहवाल सोमवारी पोलिसांना मिळाला आहे. महिलेचा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांना पुढील कारवाई करणे शक्य होईल.
भोसरीतील नॅशनल एड्स रीसर्च सेंटर येथे दोघेही स्वत:हून यापूर्वी तपासणीसाठी गेले होते. नोव्हेंबर २०१७ ला केलेल्या या तपासणीत महिलेला एचआयव्हीची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते, तर डॉक्टर पतीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. सद्य:स्थितीत दोघांचेही अहवाल ‘नारी’ संस्थेतून मागविण्यात आले आहेत. नारी संस्थेतून येणारा एचआयव्ही चाचणी अहवालच पुढील कायदेशीर कारवाईसाठी आधारभूत मानला जाणार आहे. त्या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांचीही चौकशी केली जाणार आहे. पत्नीला एचआयव्हीचा संसर्ग घडवून आणण्यामागे पतीचा नेमका उद्देश काय होता, या दिशेने पोलीस तपास सुरू आहे.