'फिटनेस’साठी पोलिसांमध्ये ‘हेल्दी कम्प्युटिशन’ असावे: रवींद्र सिंगल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 08:17 PM2021-11-13T20:17:57+5:302021-11-13T20:21:30+5:30
पिंपरी : पोलिस ‘फिट’ असावेत, असे सर्वजण बोलतात. मात्र कामाचा व्याप जास्त असल्याने पोलिसांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पोलिसांनी वेळ ...
पिंपरी :पोलिस ‘फिट’ असावेत, असे सर्वजण बोलतात. मात्र कामाचा व्याप जास्त असल्याने पोलिसांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पोलिसांनी वेळ काढून ‘फिटनेस’कडे लक्ष द्यावे. त्यासाठी पोलिसांमध्ये हेल्दी कम्प्युटिशन असणे आवश्यक आहे, असे मत राज्याचे अपर पोलीस महासंचालक डाॅ. रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केले.
आपलं पुणे सायक्लोथॉन या स्पर्धेचे निगडी येथे रविवारी (दि. १४) आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने चिंचवड येथील आटोक्लस्टर सभागृहात शनिवारी जनजागृती व मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला. या वेळी डॉ. सिंगल बोलत होते. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अल्ट्रासायकलिस्ट डॉ. हितेंद्र महाजन, दिव्या ताटे, आयर्नमॅन शुभम काजळे, सायकलपटू नीता नारंग, डॉ. महेंद्र महाजन उपस्थित होते.
डॉ. रवींद्र सिंगल म्हणाले, पोलिसांनी तंदुरुस्त रहावे यासाठी सायकलिंग, खेळ, स्पर्धा या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत. आयुष्यात काहीतरी मिळविण्याची इच्छा, काहीतरी करून दाखविण्याची जिद्द असावी. त्यासाठी अविरत प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रयत्नांमुळे आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यातून चांगल्या पद्धतीने जगल्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो. त्यासाठी आपल्याकडे बकेट लिस्ट असावी. प्रत्येकाने मानसिकदृष्ट्या सशक्त असावे. धावपळती आपण आपल्याबद्दल विसरून जातो. आपण आपल्याबाबत विचार केला पाहिजे. चालणे, धावणे, सायकलिंग यापैकी काहीतरी यातून तुमचे जगणे सुसह्य होईल.
पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, अपयश हे एक आव्हान आहे. त्यामुळे प्रयत्न करणे सुरूच ठेवावे. तसेच आपल्या कक्षा रुंद कराव्यात. सायकल चालविण्याची नशा तुम्हाला स्वावलंबी बनवते. त्यातून आरोग्याच्या समस्या कमी होण्यात मतद होते. डॉ. हितेंद्र महाजन म्हणाले, खेळ किंवा इतर छंद जोपासला तर आतील ताकद वाढते. रेस म्हणजे केवळ जोरात जाणे नव्हे तर प्रत्येक शर्यतीत, स्पर्धेत तुम्ही चुका किती कमी करता यालाही महत्व आहे. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आयुष्यात आणल्या तर जगण्याचा आनंद मिळतो.