पोलिस पुत्राच्या कारने महिलेला उडवले; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: June 13, 2024 09:50 PM2024-06-13T21:50:04+5:302024-06-13T21:51:56+5:30
अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पोलिसांनी कार चालक असलेल्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल केला.
पिंपरी : भरधाव कारने पादचारी महिलेला जोरदार धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे स्वराज रेसीडेन्सीच्या समोरील रस्त्यावर बुधवारी (दि. १२) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पोलिसांनी कार चालक असलेल्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल केला.
रेखा जिवाराम चौधरी (४०, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पती जिवाराम तेजाराम चौधरी (४४, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी), यांनी गुरुवारी (दि. १३) फिर्याद दिली. विनय विलास नाईकरे (२३, रा. प्रेस्टीन ग्रीन सोसायटी, मोशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जिवाराम चौधरी यांची पत्नी रेखा आणि मुलगी बुधवारी दुपारी स्वराज रेसिडेन्सी समोर रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी विनय नाईकरे चालवत असलेल्या भरधाव कारने रेखा यांना धडक दिली. ज्यामुळे त्या काही फूट उंचावर उडून रस्त्यावर पडल्या. त्यांना तात्काळ नजिकच्या रुग्णालयात दाखल केले. रेखा यांच्या डोळ्याला तसेच कंबरेला गंभीर दुखापत झाली.
धडकी भरवणारा अपघात
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या व्हिडिओनुसार महिला पायी जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. यात महिला काही फूट अंतरावर फेकली जाऊन रस्त्यावर पडल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ धडकी भरवणारा असून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
पोलिसाचा मुलगा अन् चर्चांना उधाण
कारचालक असलेल्या विनयचे वडील विलास नाईकरे हे पोलिस दलात नोकरीला आहेत. विलास नाईकरे हे सध्या एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात नियूक्त आहेत. दरम्यान, अपघातानंतर २४ तास उलटूनही गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र, सोशल मीडियावर अपघाताचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
अपघातानंतर पोलिस रुग्णालयात गेले होते. मात्र, नातेवाईक तक्रार देण्यास नकार देत होते. जखमी महिला बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. जखमी महिलेचे पती गुरुवारी (दि. १३) दुपारी पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल केला.
- गणेश जामदार, वरिष्ठ निरीक्षक, एमआयडीसी भोसरी पोलिस ठाणे
पोलिस पुत्राच्या कारने महिलेला उडवले; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल#pune#accidentpic.twitter.com/XFBpoZrf7l
— Lokmat (@lokmat) June 13, 2024