पिंपरीतील पोलीस चौकी अडकली ''वन वे '' च्या फेऱ्यात : पार्किंगचीही समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 09:55 AM2019-08-03T09:55:54+5:302019-08-03T09:56:31+5:30
पिंपरी कॅम्पातील मुख्य बाजारपेठ म्हणून या परिसरात दिवसभर वर्दळ असते.
नारायण बडगुजर-
पिंपरी : वन वे अर्थात एकेरी वाहतूक, अरुंद रस्ता, तोही पथारीवाले व विविध विक्रेत्यांनी बळकावलेला आदी अडथळे पार करून पिंपरी येथील पोलीस चौकीला तक्रारदाराला पोहोचावे लागते. यात खुद्द पोलिसांची चारचाकी वाहने अडकून पडतात. तर सामान्यांचे काय?
पिंपरी पोलीस ठाण्यांतर्गत पिंपरीतील रेल्वे स्टेशनसमोर पिंपरी पोलीस चौकी आहे. या चौकीच्या पाठीमागे इंदिरा गांधी उड्डाणपूल आहे. या पुलाखाली फळविक्रेते असतात. तसेच चौकीच्या संरक्षक भिंतीला लागूनही काही विक्रेत्यांनी ठाण मांडलेले असते. त्यामुळे पोलीस चौकीत चारचाकी वाहन घेऊन जाता येत नाही.
पिंपरी कॅम्पातील मुख्य बाजारपेठ म्हणून या परिसरात दिवसभर वर्दळ असते. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयाकडून येणारी वाहने कराची चौकापासून रिव्हररोडकडे वळतात. एकेरी वाहतूक असल्याने या वाहनांना शगुन चौकाकडे प्रवेश बंदी आहे. कराची चौकापासून दोनशे मीटरवर पोलीस चौकी आहे. मात्र चारचाकी वाहनांना कराची चौकातून रिव्हररोड, भाटनगर मार्गे इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून शगुन चौक तेथून रेल्वे स्टेशन रोडवरून पिंपरी पोलीस चौकीत पोहोचता येते.
दोनशे मीटर अंतरासाठी दीड ते दोन किलोमीटर अंतराचा वळसा घेऊन वाहनचालकांना चौकीला जावे लागत आहे. तसेच साई चौकातून चौकीला जायचे असल्यास रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या अरुंद रस्त्याने जावे लागते. हा रस्ता अरुंद असल्याने चारचाकी वाहनचालकांना येथे कसरत करावी लागते.
सर्वसामान्यांना चारचाकी वाहन चौकीपर्यंत घेऊन जाणे शक्य होत नाही. चारचाकी वाहनांना इंदिरा गांधी उड्डाणपुलाशिवाय पर्याय नाही. पुलाला लागून भाजीमंडईजवळ स:शुल्क पार्किंग आहे. येथे चारचाकी वाहने पार्क करून नागरिकांना पोलीस चौकीपर्यंत जावे लागते. मात्र बहुतांशवेळा या पार्किंगमध्ये जागा उपलब्ध नसते.
साई चौकाला लागून असलेल्या रेल्वे भुयारी मार्गालगतच्या मोकळ्या जागेत वाहने पार्क करावी लागतात. मात्र येथून पोलीस चौकी एक ते सव्वा किलोमीटर अंतरावर आहे.
बेशिस्त रिक्षाचालकांमुळे होतेय ह्यकोंडीह्ण
पिंपरी रेल्वे स्टेशनच्या तिकीट घरासमोर हातगाडीवाले, पथारीवाल्यांनी ठाण मांडलेले असते. तसेच रिक्षांचीही येथे गर्दी असते. यातील काही बेशिस्त रिक्षाचालक भर रस्त्यात रिक्षा थांबवितात. वाहतूककोंडी होऊन येथे पादचारी व दुचाकीचालकांनाही कसरत करावी लागते.
पोलिसांच्या मागणीनुसार चौकीच्या परिसरात पांढरे पट्टे मारून दिले आहेत. त्या पट्ट्यांच्या आतच विक्रेत्यांनी त्यांचे दुकान थाटायचे आहे. अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई होते. विक्रेते, व्यावसायिक, वाहनचालकांसह सर्वांनीच स्वयंशिस्तही पाळणे आवश्यक आहे.
- शिरीष पोरेड्डी, प्रवक्ता, स्थापत्य विभाग, महापालिका
पिंपरीतील पोलीस चौकीपर्यंत वाहने घेऊन जाताना पोलिसांनाही कसरत करावी लागते. याबाबत उपाययोजना आवश्यक आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.
- कल्याण पवार, वरिष्ठ निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे