पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 21:00 IST2022-09-21T20:59:04+5:302022-09-21T21:00:30+5:30
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत पतंगे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले....

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. भोसरी येथे बुधवारी (दि. २१) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
नंदकिशोर पतंगे (वय ३१) असे निधन झालेल्या फौजदाराचे नाव आहे. मूळचे बारामती येथील असलेले पतंगे यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११५ बॅचचे अधिकारी असलेले नंदकिशोर पतंगे हे २०१८ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. सुरुवातीला पुणे शहर पोलीस दलात त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली झाली. त्यांनी चाकण आणि पिंपरी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले. सध्या त्यांना पोलीस नियंत्रण कक्षात संलग्न केले होते.
सोमवारी (दि. १९) सायंकाळी त्यांना छातीत दुखू लागल्याने भोसरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी (दि. २१) सायंकाळी साडेसहाला त्यांची प्राणज्योत मालवली. पतंगे यांच्या निधनाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत पतंगे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.