नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या संभाव्य ४७९ उमेदवारांवर पोलिसांचा ‘वाॅच’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 01:52 PM2022-02-04T13:52:28+5:302022-02-04T13:55:37+5:30

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापले आहे...

police watch on 479 potential candidates seeking aspirants pcmc election 2022 | नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या संभाव्य ४७९ उमेदवारांवर पोलिसांचा ‘वाॅच’

नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या संभाव्य ४७९ उमेदवारांवर पोलिसांचा ‘वाॅच’

Next

नारायण बडगुजर

पिंपरी : प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर होताच पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे राजकीय घडमोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या या रिंगणात ४७९ संभाव्य उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचे पोलिसांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यातील किती उमेदवार निवडणूक काळात उपद्रव करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात, असा आढावा घेऊन पोलिसांकडून त्यांच्यावर ‘वाॅच’ ठेवण्यात येत आहे. तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या शहरातील ३९ भागातही पोलिसिंगवर भर देण्यात येत आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापले आहे. आरोप-प्रत्यारोप करून नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंतच्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १२८ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील चार नगरसेवकांचे निधन झाले. लोकसंख्येनुसार नगसेवकांची संख्या १२८ वरून १३९ करण्यात आली आहे. तसेच चार ऐवजी तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याबाबत पोलिसांच्या गोपनीय विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. यात किती उमेदवार निवडणूक लढवू शकतात, त्यातील किती उमेदवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात, किती जणांवर गुन्हे दाखल आहेत, याची माहिती देखील पोलिसांकडून संकलित केली जात आहे.

गुन्हेगारांच्या ‘फाॅलोअर्स’ची डोकेदुखी-

शहरात काही सराईत गुन्हेगार संघटितपणे गुन्हेगारी कृत्य करतात. अशा गुन्हेगारांच्या २६ टोळ्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहेत. त्यात २०७ गुन्हेगार असून, या टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच यातील काही गुन्हेगारांवर देखील विविध कारवाई झाली आहे. मात्र त्यांची क्रेझ असलेल्या काही जणांकडून गुन्हेगारी कृत्य केले जाते. सराईत गुन्हेगारांना ‘फाॅलो’ करणाऱ्या या नवख्या आरोपींचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

‘त्यां’ची ‘कुंडली’ तयार...

निवडणूक काळात उपद्रव करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करयाऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. तसेच ज्यांच्यावर दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा गुन्हेगारांची व आरोपींची माहिती घेण्यात येत आहेत. गुन्ह्यांच्या स्वरुपानुसार व आवश्यकतेनुसार त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पोलिसांकडून ‘इलेक्शन सेल’-

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यावर भर देण्यात आला आहे. निवडणूक काळात उपद्रवी तसेच गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर ‘वाॅच’ ठेवण्यासाठी पोलिसांकडून ‘इलेक्शन सेल’ कार्यान्वित करण्यात येणार आहे.

शहरातील संवेदनशील भाग-

शहरातील संवेदनशील भागांचे पोलिसांकडून सर्वेक्षण करण्यात आले. यात ३९ भाग हे संवेदनशिल असल्याचे समोर आले. नेहरूनगर पुनर्वसन वसाहत, विठ्ठलनगर, गांधीनगर, खराळवाडी, वैशालीनगर, मिलिंदनगर, शास्त्रीनगर, रमाबाईनगर, सुभाषनगर, महात्मा फुलेनगर, विद्यानगर, पिंपरी गावठाण, भाटनगर, लालटोपीनगर, काळभोरनगर, इंदिरानगर, लींक रोड, आनंदनगर, वेताळनगर, दळवीनगर, बिजलीनगर, नागसेननगर, महात्मा फुलेनगर, लांडेवाडी, बालाजीनगर, फातिमा नगर, दापोडी, काळाखडक, थेरगाव फाटा स्कीम, अजंठानगर, जाधववाडी, घरकुल, चिखली गावठाण, रमाबाईनगर, सुसगाव, महाळुंगे, बावधन, भुमकर वस्ती, पुनावळे या भागाचा यात समावेश आहे.  

निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून तयारी सुरू आहे. त्यासाठी काही जणांवर कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे. त्याची माहिती संकलित केली जात आहे.
- पद्माकर घनवट, सहायक पोलीस आयुक्त

Web Title: police watch on 479 potential candidates seeking aspirants pcmc election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.