पोलिस २२ दिवस करणार २४ तास खडा पहारा; ‘स्ट्राँग रुम’च्या बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा तैनात
By नारायण बडगुजर | Published: May 14, 2024 07:52 PM2024-05-14T19:52:06+5:302024-05-14T19:53:54+5:30
लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (दि. १३) झाले. यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठीही मतदान प्रक्रिया झाली...
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. त्यानंतर मतदान यंत्र सीलबंद करून बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलच्या स्ट्राँग रुममध्ये हलविण्यात आले. स्ट्राँग रुमसाठी २७ पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) तसेच राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) यांची प्रत्येकी एक तुकडी तैनात केली आहे.
लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (दि. १३) झाले. यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठीही मतदान प्रक्रिया झाली. तसेच २० मे रोजी पाचवा टप्पा, २५ मे रोजी सहावा टप्पा तर १ जून रोजी सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया होत आहे. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी बालेवाडी येथे मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने मतदान यंत्र बोलवाडीतील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आली आहेत. या स्ट्राँग रुममध्ये ४ जूनपर्यंत पोलिसांचा २४ तास खडा पहारा राहणार आहे.
स्ट्राँग रुममधील बंदोबस्त आणि सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी बालेवाडी येथील स्ट्राँग रुमला भेट देऊन पाहणी केली. अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त डाॅ. विशाल हिरे, हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस कन्हैया थोरात, सीआरपीएफ आणि एसआरपीएफचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
दोन शिफ्टमध्ये राहणार बंदोबस्त
बालेवाडीतील स्ट्राँग रुमसाठी सहायक पोलिस आयुक्त - १, पोलिस निरीक्षक - २, सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक - ४, पोलिस अंमलदार - २० तसेच सीआरपीएफ आणि एसआरपीएफ यांच्या प्रत्येकी एक अशा दोन प्लाटून तैनात केल्या आहेत. एका प्लाटूनमध्ये दोन अधिकारी तसेच ३० कर्मचारी अशा ३२ जवान असतात. सकाळी आठ ते रात्री आठ आणि रात्री आठ ते सकाळी आठ अशा दोन शिफ्टमध्ये हा बंदोबस्त राहणार आहे.