Pimpri Chinchwad Police: वेशीवरील गुन्हेगारांसाठी पोलिस ओलांडणार हद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 09:55 AM2023-06-19T09:55:09+5:302023-06-19T09:57:48+5:30
पहिल्या टप्प्यात वडगाव पोलिस ठाण्याचा समावेश?...
- नारायण बडगुजर
पिंपरी : कोम्बिंग ऑपरेशन तसेच विशेष मोहीम राबवून पिंपरी-चिंचवडपोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांनी व त्यांच्या टोळ्यांनी आयुक्तालय हद्दीलगतच्या भागात आसरा घेत असल्याचे समोर आले आहे. तसेच हद्दीलगतचे गुन्हेगार शहरात येऊन गुन्हेगारी कृत्य करतात. वेशीवरील या गुन्हेगारांचा व टोळ्यांचा बिमोड करणे आवश्यक आहे. त्यामुळे आयुक्तालयाची हद्दवाढ करून काही भाग व काही पोलिस ठाण्यांचा शहर पोलिस दलात समावेश करण्यात येणार आहे.
दिवसाढवळ्या गोळीबारासह हत्यारांनी वार करून खुनाचे प्रकार शहरात घडले. त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात येत आहे. परिणामी शहरातील गुन्हेगार आश्रयासाठी हद्दीबाहेर पसार झाले आहेत. यात काही गुन्हेगारी टोळ्यांचे सदस्य हद्दीलगत लपून गुन्हेगारी कृत्य करीत आहेत. मुळशी व मावळ तालुक्यातील काही भाग पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत आहे. हद्दीतील गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून, त्यांनी शहराबाहेर बस्तान हलविले आहे. अशा गुन्हेगारांचा गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून शोध सुरू आहे.
‘त्यांची’ कुंडली पोलिसांकडे
तळेगाव दाभाडे येथे किशोर आवारे यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी मावळ तालुक्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत केले आहे. मावळातील ग्रामीण भागातील गुन्हेगारी टोळ्या व गुन्हेगारांची कुडली काढण्यात येत आहे. त्यातील गुन्हेगार सध्या कोठे आहेत, काय करत आहेत, याची माहिती पोलिस घेत आहेत. तसेच सराईतांच्या मागावरही पोलिस आहेत.
पहिल्या टप्प्यात वडगाव पोलिस ठाण्याचा समावेश?
मावळा तालुक्यातील वडगाव पोलिस ठाण्यांतर्गत मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीला लागून वडगाव पोलिस ठाण्याची हद्द आहे. या निमशहरी भागाच्या वडगाव पोलिस ठाण्याचा आयुक्तालयांतर्गत समावेश करण्याबाबत आयुक्तालयस्तरावर हालचाली सुरू आहेत.
वाहतूक नियोजनासाठी होणार फायदा
वडगाव पोलिस ठाणे शहर हद्दीत आल्यास गुन्हेगारीच्या बिमोडासह वाहतुकीचे नियोजनासाठी देखील फायद्याचे ठरणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे शक्य होणार आहे.
मावळात सात पोलिस ठाणे
पुणे व मुंबई या दोन महानगरांच्या जोडणाऱ्या द्रुतगती तसेच महामार्गावर असलेल्या मावळ तालुक्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. त्यामुळे येथे जमिनींना सोन्याचे दर आले आहेत. त्यातूनच काही गुन्हेगारी टोळ्या, भूमाफिया येथे आहेत. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी मावळ तालुक्यात सात पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत शिरगाव-परंदवडी, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी तसेच पुणे ग्रामीणच्या हद्दीत वडगाव, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण ही पोलिस ठाणे आहेत. यावरून येथील गुन्हेगारीचे स्वरुप लक्षात येते.
दोन हद्दींचा गुन्हेगारांना फायदा
मावळ व मुळशी तालुक्यात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण पोलिस अशा दोन हद्दी आहेत. याचा गैरफायदा घेऊन गुन्हेगार गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवतात. हद्द एकच असल्यास अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे सहज शक्य होणार आहे.
मावळातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात वडगाव पोलिस ठाणे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत घेण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात येणार आहे.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड