पोलीसही होणार आता ‘एक दिवसाचे सीएम’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 03:25 AM2019-03-15T03:25:46+5:302019-03-15T07:26:11+5:30
गुन्हेगारी रोखण्यासाठी राबविणार अभिनव प्रयोग
पिंपरी : अभिनेता अनिल कपूरच्या ‘नायक’ या चित्रपटातील ‘एक दिन का सीएम’ या संकल्पनेवर आधारित पोलिसांनाही ‘एक दिवसाचा सीएम’ होण्याची अभिनव संधी उपलब्ध होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत हा प्रयोग करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी ही अभिनव संकल्पना साकारण्याचे नियोजन केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या नेतृत्वाखालील पथकाला कोणत्याही एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दिवसासाठी गुन्हेगारी रोखण्याची धडक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक एक दिवसाचा ‘नायक’ ठरणार आहे.
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध प्रयोग आणि उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘एक दिन का सीएम’ हा प्रयोग पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. आयुक्तालया अंतर्गत असलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्याचा यात समावेश आहे. यातील कोणत्याही पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकास एका दिवसासाठी नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. तसेच अवैध धंदे, सराईत गुन्हेगारांवरील कारवाई अशी कारवाई करून मिळालेल्या संधीतून कतृत्वाची चमक दाखवता येणार आहे. त्यांच्या नेतृत्वातील पथक एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसभर गुन्हेगारांवर कारवाई करू शकणार आहे. असे पथक नियुक्त करताना गुप्तता पाळण्यात येणार आहे. संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कारवाई करावयाच्या दिवशीच याबाबतची अचानक सूचना दिली जाणार आहे. त्या दिवसासाठी त्यांना इतर कामकाजातून मोकळीक दिली जाणार आहे. संबंधित पथकाने कारवाईसाठी कोणतेही एक पोलीस ठाण्याची हद्द निश्चित करायची आहे. संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार अड्डे, गुटखा विक्री, दारूची अवैध विक्री, अवैध धंदे, अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक आदींवर कारवाई करता येणार आहे.
पोलिसांना रहावे लागणार ‘अलर्ट’
पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही दिवशी असा प्रयोग होऊ शकतो. त्यामुळे सर्वच पोलीस ठाण्यांतील पोलिसांना रोजच सतर्क रहावे लागणार आहे. अशा पद्धतीचा अभिनव उपक्रम काही अंशी का होईना, गुन्हेगारी नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणार आहे. पथक अचानक भेट देऊन कारवाई करण्याची शक्यता असल्याने पोलिसांना खबरदारी घेणे भाग पडणार आहे.
‘रिस्पॉन्स टीम’ला सतर्क ठेवण्याचा प्रयत्न
नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून ‘रिस्पॉन्स टीम’ स्थापन करण्यात आली. मात्र या ‘टीम’कडून काही वेळेस ‘स्लो रिस्पॉन्स’ मिळत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना सतर्क ठेवण्यासाठी आयुक्त पद्मनाभन प्रयत्नशील आहेत. अशा अभिनव प्रयोगाने गुन्हेगारी कमी होऊन प्रत्येक ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सतत सतर्क राहण्यास मदत होणार आहे.
बेशिस्तीला बसणार लगाम
वेळीच उपाययोजना न केल्यास गुन्हेगारीत वाढ होते. काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा आणि बेशिस्तपणा याला काहीअंशी कारणीभूत असतो. अशा बेशिस्तीला या अभिनव प्रयोगामुळे लगाम घालण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यातील काम सुरळीत होईल आणि तक्रारदारांना त्वरित मदत मिळेल तसेच गुन्हेगारी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.