PCMC | खासगी कार्यक्रमांना हजेरी पण दादा, भाऊंना पालिकेतील आढावा बैठकांना नाही वेळ
By विश्वास मोरे | Published: May 24, 2023 04:29 PM2023-05-24T16:29:21+5:302023-05-24T16:30:02+5:30
पालकमंत्र्यांचा महापालिकेत केवळ एक दौरा....
पिंपरी : गेल्या दहा महिन्यात अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासगी आणि पक्षाच्या कार्यक्रमांना येतात. मात्र, दादा आणि भाऊंचे महापालिकेत आढावा बैठका घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. तर खासगी दौरे असले तरी दादा आणि भाऊ शहराच्या प्रश्नांचा आढावा घेत असल्याचा दावा शिंदे आणि फडणवीस गटाने केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत एक वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. २०१९ मध्ये महाविकास आपघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिकेत लक्ष घातले होते. महापालिकेत येऊन ते बैठका घेत असत. कोरोना काळात शहरात अनेकदा दौरे केले होते. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता नसतानाही आमदार म्हणून पवार यांनी लक्ष दिले होते.
त्यानंतर दहा महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यात पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली आहे. त्यांनी दहा महिन्यांच्या कालावधीत एकदा महापालिकेत हजेरी लावून आढावा बैठक घेतली होती. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेकदा खासगी आणि राजकीय कार्यक्रमांसाठी आले मात्र, त्यांनी महापालिकेत बैठक घेतली नाही. पुण्यात जिल्हा नियोजनाच्या बैठकीस पालकमंत्री उपस्थित असतात. मात्र, महापालिकेत येऊन आढावा बैठक घेत नसल्याचे दिसून येते.
पोट निवडणूकीत तळ ठोकून
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक झाली. त्या निवडणूकीसाठी शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रीमंडळ, खासदार आमदार आणि केंद्रातील मंत्री तळ ठोकून होते. प्रभागस्तरीय बुथस्तरीय नियोजन केले होते. तसेच पक्षपातळीवरील आढावा बैठकींनाही मंत्री येत असतात.
पालकमंत्र्यांचा महापालिकेत केवळ एक दौरा
पालकमंत्री याचे दौरे शहरात खूप होत आहेत. मात्र, त्यांनी दहा महिन्यांच्या कालावधीत महापालिकेत एकदाच आढावा बैठक घेण्यात आली. तसेच मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पक्षस्तरीय बांधणीस सुरूवात झाली आहे. त्यासाठी मंत्री आणि पक्षातील नेते शहरात येतात. तसेच पक्षाच्या बैठकांना आणि कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली आहे.
चार महिन्यांत कोणत्या मंत्र्यांचे किती दौरे?
गेल्या चार महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, उद्योगमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींचे दौर झाले आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना आम्ही भेटत असतो. प्रश्न मांडत अशातो. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्व मंत्री प्रयत्न करीत असतात. सरकार स्थापनेपासून शहरातील पाणी, अनधिकृत बांधकामे शास्ती माफी असे अनेक प्रश्न सोडविले आहेत.
नामदेव ढाके, (माजी सत्तारूढ पक्षनेता)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नांचा आढावा घेत असतात. राज्य सरकारने शहरवासियांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. स्थानिक पातळीवर आमदार आणि खासदार आढावा बैठका घेत असतात. त्यातून प्रश्नांची सोडवणूक केली जात आहे.
-बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हाध्यक्ष) शिंदे गट