राजकीय नेत्यांच्या गप्पांचा रंगला फड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 02:21 AM2017-10-22T02:21:57+5:302017-10-22T02:21:59+5:30
एरवी आपापल्या पक्षाची भूमिका मांडणारे, कधी विरोधात बोलणारे, तर कधी एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे विविध राजकीय पक्षांचे शहरातील प्रमुख नेते शनिवारी एकत्र आले.
पिंपरी : एरवी आपापल्या पक्षाची भूमिका मांडणारे, कधी विरोधात बोलणारे, तर कधी एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे विविध राजकीय पक्षांचे शहरातील प्रमुख नेते शनिवारी एकत्र आले. राजकीय मतभेद विसरून या दिग्गज नेत्यांच्या गप्पांची मैफल तब्बल अडीच तास रंगली. निमित्त होते दिशा सोशल फाउंडेशनने आयोजित ‘दिवाळी फराळ’ या उपक्रमाचे.
निगडी प्राधिकरणातील एका हॉटेलमध्ये झालेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमास शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा सदस्य अमर साबळे, भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार, राष्टÑवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले माजी आमदार विलास लांडे, भाजपात प्रवेश केलेले माजी महापौर आझम पानसरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल कलाटे, राष्टÑवादी काँग्रेसचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे, लोकमान्य होमिओपॅथी कॉलेजचे विश्वस्त निहाल पानसरे, वेणू साबळे आदी उपस्थित होते.
सुमारे अडीच तास रंगलेल्या या गप्पांच्या मैफलीत १९८६ ते २०१७ पर्यंतच्या कालावधीतील विविध आठवणींना उजाळा देण्यात आला. धमाल किस्से व भन्नाट विनोदांच्या देवाणघेवाणीमुळे वातावरण खेळीमेळीचे झाले होते. या वेळी एकमेकांची फिरकी घेण्याची संधी कोणी सोडली नाही. शहर विकासासाठी एकत्र येण्याची ग्वाही या नेत्यांनी आवर्जून दिली.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गोरख भालेकर यांनी केले. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. सचिन साठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.