पिंपरीत रेशनिंगवरील गरीबांच्या तोंडचा घास पळवताहेत राजकारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 04:56 PM2020-04-17T16:56:37+5:302020-04-17T17:00:02+5:30
राजकीय नेते दबाव टाकून सामान्यांचा शिधा गायब करून चमकोगिरी केली सुरू
विश्वास मोरे-
पिंंपरी : कोरोनाचा विळखा वाढत असताना गरीबांपर्यंत शिधा पोहोचत नसल्याचे चित्र असून आधार लिंक केलेल्या शिधापत्रिकांनाच सध्या शिधा पोहोचला जात आहेत. लिंक न झालेल्या शिधापत्रिकाधारक लाभापासून वंचित आहेत. तर दुसरीकडे राजकीय नेते दबाव टाकून सामान्यांचा शिधा गायब करून चमकोगिरी सुरू केली आहे. त्यामुळे रेशनचे वितरण करणाऱ्यांची कोंडी झाली आहे. गरीबांच्या तोंडचा घास पळविला जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे औद्योगिकनगरीचे चाक थंड झाले असून जनजीवन विस्कळीत झाले असून, सर्वसामान्यांना, हातावरचे पोट असणाऱ्यांना दोन वेळेचे जेवणाची भ्रांत होऊ लागली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय असे नागरिक वास्तव्यास आहेत. शहराची लोकसंख्या २३ लाखांवर गेली आहे. तर मिळकतींची संख्या साडेचार लाख आहे.
अन्न व धान्य पुरवठा विभागाच्या वतीने अ (चिंचवड विधानसभा), ब, ज (पिंपरी विधानसभा) या दोन परिमंडळ विभागाचे कामकाज सध्या एकाच कार्यालयाकडून सुरू आहे. स्वतंत्र कार्यालयाची मागणी अनेक काळापासून आहे. अ विभागात ९७ दुकानदार असून कार्डसंख्या २९,५२४ तर, ज विभागात ८३ दुकानदार असून कार्डसंख्या २८,३१६ आहे.
शहरासाठी स्वतंत्र अन्नधान्य वितरण कार्यालय आहे. तसेच पिवळ्या, पांढºया आणि केशरी अशा शिधापत्रिकाधारक आहेत. तसेच शहरातील विविध भागात रेशनची दुकाने आहेत. विविध उद्योगांत कामधंद्यासाठी देशातील आणि राज्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. मात्र, वाढत्या नागरिकीकरणात रेशनधारकांची दुकाने कमी आहेत. त्यापैकी शासकीय प्रणालीशी शिधापत्रिका लिंक होण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच या शहरात पिवळ्या, पांढºया आणि केशरी अशा शिधापत्रिका असूनही अनेकांना शिधा मिळत नाही.
प्रशासन शासकीय आदेशाच्या प्रतीक्षेत
*अन्नधान्य वितरण विभागाच्यावतीने रेशन दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना शिधा पुरविण्यात येतो. कार्डांच्या संख्येनुसार जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून अन्नधान्य पुरवठा होत असतो. त्यामुळे काडार्नुसार अन्नधान्य पुरवठा पुरेसा असल्याचे अधिकाºयांचे मत आहे. मात्र, सरसकट शिधापत्रिका धारकांना रेशन देण्याचा निर्णय न झाल्याने कार्ड असूनही केवळ ते लिंक न झाल्याने नागरिकांना शिधा मिळत नाही. अधिकारी आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
*दबाव टाकून शिधा गायब
काडार्नुसार शंभर टक्के शिधा नागरिक नेत नाहीत. तसेच शहरातील मोठ्या प्रमाणावर नागरिक आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे आधारशी रेशन कार्ड लिंक असूनही केवळ कार्डधारक उपस्थित नसल्याने शिधा पडून आहे. याचाच फायदा राजकीय पक्षांचे नेते, नगरसेवक यांनी घेतला आहे. आपापल्या भागातील रेशन दुकानदारांकडून पोत्याने माल घेऊन जात आहेत. तसेच मोठमोठ्या नेत्यांची नावे सांगून दुकानदारांवर दबाव टाकला आहे. भीतीने दुकानदार तक्रार करायला तयार नाहीत. मिळालेला शिधा स्वत:च्या नावाने चमकोगिरी केली जात आहे. दुकानदार लूट करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
.............
काही काळ्या यादीत गेल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे त्यांचे रेशन कार्डला आधार कार्ड लिंंक झालेले नाही. या रेशन कार्डधारकांना पूर्वी धान्य मिळत होते; परंतु आॅनलाइन न झाल्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही, अशा नागरिकांची पिंंपरी-चिंंचवड शहर आणि प्रभागांमध्ये संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. या नागरिकांचे रोजगार बंद झाल्यामुळे तसेच दररोजची कमाई होत नसल्यामुळे हाल होत आहेत. सर्व कार्डधारकांना धान्य द्यावे.
-राहुल कलाटे,गटनेता शिवसेना
सध्याच्या काळात लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत, त्यामुळे या नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. लॉकडाऊनमुळे घर सोडू शकत नाहीत व घरी खायला काही नाही, अशी अवस्था झालेली आहे. हेल्पलाइनवर गोरगरीब, झोपडपट्टीतील नागरिक संपर्क साधू शकणार नाही, अथवा साधता येणार नाही. त्यामुळे या लोकांची उपासमार होणार आहे.सरसकट धान्य द्यावे. -नाना काटे, विरोधीपक्षनेते, महापालिका
पिंपरी-चिंचवड ही कामगार, कष्टकºयांची नगरी आहे. मात्र, त्याठिकाणी हातावरचे पोट असणाºया नागरिकांची संख्या अधिक आहे. सध्या रेशन हे ज्या कार्डधारकांचे आधार लिंक झाले आहे, त्यांनाच रेशन मिळत आहे. मात्र, इतर लोकांना शिधा मिळत नाही. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने कोरोनाच्या कालखंडात कार्ड असणाºया सर्वांना रेशन द्यावे. महिनाभर लॉकडाऊन असल्याने उपासमार होण्याची वेळ आली आहे.
- बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्टÑ कामगार पंचायत
आधार लिंक असलेल्या कार्डधारकांना सुरळीतपणे शिधा पुरवठा सुरू आहे. आधार लिंक नसलेल्या शिधा पत्रिकाधारकांना शिधा देण्यासंदर्भात अद्याप शासनाचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे लिंक असलेल्या कार्डधारकांना शिधा पुरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी,
अन्न- धान्य वितरण विभाग