‘पवना जलवाहिनी’वरून भाजपात राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:26 AM2018-08-14T01:26:37+5:302018-08-14T01:26:54+5:30
शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पवना बंद पाईप लाईन प्रकल्प सुरू केला होता. परंतु भाजपाने हा प्रकल्प राजकारण करून बंद पाडला.
पिंपरी - शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पवना बंद पाईप लाईन प्रकल्प सुरू केला होता. परंतु भाजपाने हा प्रकल्प राजकारण करून बंद पाडला. भाजपाचे सरकार आल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन शहरातील नागरिकांना दिले होते. या प्रकल्पाबाबत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी भूमिका स्पष्ट करावी. राजकारण करून जनतेच्या भावनांशी खेळून दिशाभूल करू नये, अशी टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.
पवना जलवाहिनीवरून भाजपात दोन गट पडले आहेत. मावळात जलवाहिनी होऊ देणार नाही, अशी भूमिका बाळा भेगडे यांनी घेतली आहे. चर्चा करून पाणी आणू, अशी भूमिका पिंपरीतील भाजपा नेत्यांनी घेतली आहे. यावर राष्टÑवादीने टीका केली आहे. साने म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने तीस वर्षांचे व्हीजन ठेवले होते. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर विकास प्रकल्पांना खिळ बसली. भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण होऊनही आजही हे प्रकल्प जैसे थे आहेत.
लोकप्रतिनिधींमध्ये नाही समन्वय
भाजपाकडे विकासाचे व्हीजन नाही, प्रकल्पांमध्ये मलिदा खाण्यावर यांचा डोळा आहे. कोणत्याच प्रकल्पावरती दोन्ही आमदारांचे एकमत होत नाही. पालकमंत्र्यांची वेगळीच भूमिका असते. तर मावळातील आमदार बाळा भेगडे यांची या प्रकल्पासाठीची भूमिका स्पष्ट आहे. शहरातील भाजपाची एक भूमिका व मावळातील भाजपाची दुसरी भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे तिन्ही आमदारांनी व पालकमंत्र्यांनी आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी. तिन्ही आमदारांनी व पालकमंत्र्यांनी समन्वय ठेवावा़ पवना जलवाहिनी पूर्ण होणार की नाही हे स्पष्ट करावे, असे दत्ता साने म्हणाले.