पालिकेतील लाचखोरीवरून राजकारण
By admin | Published: April 29, 2017 04:13 AM2017-04-29T04:13:57+5:302017-04-29T04:13:57+5:30
महापालिका आयुक्तांचे स्वीय सहायक राजेंद्र शिर्के आणि उपद्रव शोध पथकात काम करणाऱ्या अजय सिन्नरकर यांना लाच घेताना पकडले.
पिंपरी : महापालिका आयुक्तांचे स्वीय सहायक राजेंद्र शिर्के आणि उपद्रव शोध पथकात काम करणाऱ्या अजय सिन्नरकर यांना लाच घेताना पकडले. पारदर्शकतेचा टेंभा मिरविणाऱ्या महापालिकेत आयुक्तांचा सहकारी लाच घेतो. या प्रकरणाचा निषेध करण्यापेक्षा लाचखोरीवरून राजकीय नेत्यांमध्ये जुंपली आहे. लाचखोरीच्या प्रकरणाकडे भाजपाच्या नेत्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष करीत विरोधकांवर टीका करण्यास सुरवात केली आहे.
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर एकापाठोपाठ एक लाचखोरीचे प्रकरण उजेडात आले आहे. महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. लाचखोरीवरून भाजपा व राष्ट्रवादी उणेदुणे काढू लागली आहे. व्यक्तिगत आरोप प्रत्योरोप सुरू आहेत. त्यामुळे शहरवासीयांचे मनोरंजन होत आहे.
भाजपाच्या नगरसेविका सुजाता पालांडे म्हणाल्या,‘‘महापालिका आयुक्तांच्या स्वीय सहायकाला लाच प्रकरणात झालेल्या अटकेवरून माजी महापौर मंगला कदम यांनी आकांडतांडव करणे म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को,’ अशी परिस्थिती आहे. महापालिका ताब्यात असताना ज्यांनी भ्रष्टाचाराचा कळस केला, त्यांनीच आज भ्रष्टाचारावर बोलणे म्हणजे मोठा विनोदच आहे. राज्यात भाजपा सत्तेत आल्यापासूनच महापालिकेतील लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना लाचखोरांना अभय दिले होते. दोन सत्ताधाऱ्यांमधील हा फरक जनतेला कळला. त्यामुळे सत्तांतर झाले. विरोधकांच्या काळात महापालिकेकडे पैसे असूनही त्याप्रमाणात शहराचा विकास झाला नाही.’’ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी भाजपाच्या कारभारावर टीका केली. तसेच, महापालिका आयुक्तांच्या स्वीय सहायकाला लाच प्रकरणात झालेल्या अटकेवरून भाजपचा चेहरा असलेले आयुक्त दिनेश वाघमारे यांचाही लाच प्रकरणात हात असल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला. (प्रतिनिधी)