...आता दोन वेळा पाण्याचेही राजकारण
By admin | Published: January 9, 2017 03:00 AM2017-01-09T03:00:25+5:302017-01-09T03:00:25+5:30
महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारपासून मिळणार दोन वेळा पाणी, अशी घोषणा केली असली तरी त्यात तांत्रिक अडचणी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
पुणे : महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारपासून मिळणार दोन वेळा पाणी, अशी घोषणा केली असली तरी त्यात तांत्रिक अडचणी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यावरून दोन वेळा पाणी देण्यातही राजकारण साधण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुंबईतील कालवा समितीच्या बैठकीनंतर पुण्याला लवकरच दोन वेळा पाणी सुरू करणार, अशी घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच महापौर जगताप यांनी सोमवारपासून (दि. ९) दोन वेळा पाणी मिळणार असे जाहीर केले. मात्र, प्रशासनाने इतक्या त्वरेने हा निर्णय अमलात आणणे शक्य नाही, असे स्पष्ट केले असल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यांनी तांत्रिक अडचण सांगितली असल्याची माहिती मिळाली.
पाणीपुरवठा विभागाचे काम पाहणारे कनिष्ठ अभियंते निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. तसेच, पाणी सोडण्याचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्हॉल्वमन पर्यंत ही माहिती पोहोचवणे याला वेळ लागणार, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. दोन वेळा पाणी सोडायचे असेल, तर त्यासाठी प्रशासनाला नवे वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. पाण्याची उपलब्धता असली तरी सध्या त्याचे समान वाटप होत नाही, असे प्रशासनााचे म्हणणे आहे. काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या परिसरात काम करणाऱ्या पाणी पुरवठा विभागातील अभियंते, कर्मचारी यांच्यावर दबाव आणून नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ पाणी मिळेल, अशी व्यवस्था केली आहे.(प्रतिनिधी)