खडकाळ्यात शांततेत मतदान

By admin | Published: August 20, 2015 02:31 AM2015-08-20T02:31:41+5:302015-08-20T02:31:41+5:30

खडकाळा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी फेरमतदान बुधवारी शांततेत पार पडले. नाकाबंदी, चित्रीकरण, मतदान केंद्र व परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

Polling in silence in the rock | खडकाळ्यात शांततेत मतदान

खडकाळ्यात शांततेत मतदान

Next

वडगाव मावळ : खडकाळा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी फेरमतदान बुधवारी शांततेत पार पडले. नाकाबंदी, चित्रीकरण, मतदान केंद्र व परिसरात सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदारांनी लांबलचक रांगा लावून उत्स्फूर्तपणे मतदान केले. शेवटच्या एक तासात मतदान केंद्रावर शुकशुकाट झाला होता.
खडकाळा ग्रामपंचायत निवडणूक मतदान सुरू असताना दि. ४ आॅगस्टला मनसे तालुकाध्यक्ष मंगेश वाळुंज यांच्या खुनाची घटना घडल्याने जमावाने ७ मतदान केंद्रांची तोडफोड करून मतदान बंद पाडले. या घटनेमुळे राज्य निवडणूक आयोगाने खडकाळा अतिसंवेदनशील मतदान केंद्र घोषित करून ग्रामपंचायतीचे फेरमतदान बुधवारी घेतले. प्रत्येक मतदान केंद्राला तहसीलदार शरद पाटील यांनी भेट दिली.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर कामशेतमध्ये बुधवार व गुरुवार या दोन दिवस जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्र व परिसरात चित्रीकरण करण्यात येत होते. नाकाबंदी असल्याने मतदान केंद्रात बाहेरील नागरिकांना प्रवेश नसल्याने गर्दी झाली नाही. साध्या वेशातून पोलीस मतदान केंद्र व परिसरात संशयित व्यक्ती व वस्तूंवर करडी नजर ठेवत होते. कामशेत बाजारपेठेत मतदान सुरू असल्याने बऱ्याच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. गजबजलेले रस्ते व चौक ओस पडले होते. तुरळक गर्दी दिसत होती. कामशेत येथे कडक बंदोबस्त असल्याने छावणीचे स्वरूप आले होते. मंगळवारी शेकडो पोलीस जवानानी पथसंचलन केल्याने नागरिकांमध्ये मतदान करण्यासाठी उत्साह निर्माण झाल्याचे नागरिक सांगत होते.
या वेळी पोलीस अधीक्षक जय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विनायक ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विजय जाधव, वसंत बाबर, प्रदीप काळ यांच्यासह १० पोलीस उपनिरीक्षक, ७५ पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे ३० जवान तैनात केले होते. (वार्ताहर)

Web Title: Polling in silence in the rock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.